न्यायालयाने कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मोठा दणका दिला आहे. माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. १९९५ साली कागदपत्रांच्या फेरफार आणि फसवणुकीचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर करण्यात आला होता. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी या प्रकरणी याचिका दाखल केली होती. नाशिक जिल्हा न्यायालयाने आता माणिकराव कोकाटे यांना शिक्षा दिली आहे. मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका बनावट कागदपत्रे तयार करून लाटल्याच्या प्रकरणात राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांना प्रत्येकी दोन वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, कृषिमंत्र्यांच्या आमदारकी आणि मंत्रिपदावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांच्यावर फसवणुकीचा आरोप
मुख्यमंत्री कोट्यातून कमी दरात सदनिका मिळवण्यासाठी संबंधित व्यक्तीला प्रतिज्ञापत्र आणि आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक असते. ॲड. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी 1995 मध्ये अशी कागदपत्रे सादर करून कॅनडा कॉर्नर भागातील निर्माण व्हू अपार्टमेंटमध्ये दोन सदनिका प्राप्त केल्या. याशिवाय, या इमारतीतील अन्य दोन सदनिका इतर व्यक्तींनी मिळवल्या होत्या, परंतु त्या सदनिकांचा वापर कोकाटे बंधूंनी केला.
त्यावेळी त्यांनी सांगितले होते की, “आमचं उत्पन्न कमी आहे आणि दुसरं घर नाही,” असे सांगून सदनिका मिळवण्याचा दावा केला. या संदर्भात तक्रारी दाखल झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने चौकशी केली आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील नागरी जमीन विभागाचे तत्कालीन अधिकारी विश्वनाथ पाटील यांनी ॲड. माणिकराव कोकाटे, विजय कोकाटे यांच्यासह चार जणांविरुद्ध बनावट दस्तऐवज सादर करून सदनिका मिळवण्याच्या प्रकरणी तक्रार केली. त्यावरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाशिक येथील सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता आणि कागदपत्रांच्या फेरफार आणि फसवणुकीबद्दल भादवी कलम 420, 465, 471 आणि 47 अंतर्गत गुन्हा नोंदवला गेला होता.
2 वर्षांची शिक्षा आणि 50 हजार रुपये दंड
या प्रकरणात एकूण चार आरोपी होते, त्यात माणिकराव कोकाटे, त्यांचे बंधू सुनील कोकाटे आणि दोन अन्य व्यक्तींचा समावेश होता. कोर्टाने इतर दोन आरोपींविरोधात कुठलीही शिक्षा ठोठावली नाही, मात्र माणिकराव कोकाटे आणि सुनील कोकाटे यांना दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
मंत्रिपद आणि आमदारकी गमवावी लागू शकते
या प्रकरणाची सुनावणी जिल्हा न्यायालयात पूर्ण झाली आणि न्यायालयाने कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना दोषी ठरवले, त्यांना प्रत्येकी दोन वर्षांची कारावासाची शिक्षा आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला. सरकारी अभियोक्ता ॲड. पूनम घोडके यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आणखी दोन संशयित होते, परंतु पुराव्याअभावी त्यांना मुक्त केले गेले. चौकशीत समोर आले की, संबंधितांच्या सदनिकांचा वापर कोकाटे बंधूंकडून होत होता.
माणिकराव कोकाटे यांचे मंत्रिपद आणि आमदारकी धोक्यात
न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांचा कारावास ठोठावला आहे. भारतीय कायद्यानुसार, लोकप्रतिनिधीला दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा झाल्यास त्याचे सभागृहाचे सदस्यत्त्व रद्द होऊ शकते. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद आणि आमदारकी गमवावी लागू शकते. असे झाले तर माणिकराव कोकाटे यांच्या राजकीय कारकीर्दीला मोठा धक्का लागेल.
मात्र, माणिकराव कोकाटे वरिष्ठ न्यायालयात जाऊन या शिक्षेला स्थगिती मिळवू शकतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. अजित पवार गटाच्या दुसऱ्या मंत्र्याच्या अडचणीने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. धनंजय मुंडे यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या नेत्याच्या मंत्रिपदावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे माणिकराव कोकाटे, अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस या प्रकरणात काय पाऊले उचलतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.