राजीनामा? पण मी केलं तरी काय? – कृषिमंत्र्यांचा सवाल

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे विधानसभेत मोबाईलवर रमीचा गेम खेळत असल्याचा कथित व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केला होता. या प्रकरणानंतर राज्यात तीव्र राजकीय वादंग निर्माण झाले.

व्हिडिओ पोस्ट करताना रोहित पवार म्हणाले होते, “अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपाची परवानगी घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेत नाही. आज महाराष्ट्रात शेतीविषयक अनेक गंभीर प्रश्न प्रलंबित आहेत आणि दररोज सरासरी आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत. अशा परिस्थितीत कृषीमंत्री मात्र काम न करता रमी खेळण्यात वेळ घालवत आहेत, हे दुर्दैवी आहे.”. विरोधकांनी या घटनेचा मुद्दा उचलून धरत सरकारवर टीकेची झोड उठवली. राज्यातील वातावरण तापल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकारावर नाराजी व्यक्त केली, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकाटेंना स्पष्ट शब्दांत समज दिली.

मात्र एवढं सगळं घडूनही, पत्रकार परिषदेत माणिकराव कोकाटे यांच्या चेहऱ्यावर ना पश्चातापाची झलक दिसली, ना कोणतीही चिंता. रमी खेळल्याच्या आरोपांवरून विरोधकांकडून कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी होत असताना, ते मात्र अत्यंत निवांतपणे बसून आपल्या कृतीचं स्पष्टीकरण देत होते. “तो व्हिडिओ माझा नाहीच, मी असं काही केलंच नाही,” असा युक्तिवाद करत कोकाटे यांनी या संपूर्ण प्रकरणाकडे तुच्छतेने पाहिलं. “हा इतका लहानसा विषय आहे, तो इतका वाढवण्यात काय अर्थ आहे हेच समजत नाही,” असं म्हणत त्यांनी स्पष्ट केलं की, “ऑनलाईन रमी सुरू झाल्यापासून मी आजपर्यंत कधीही रमी खेळलेलो नाही. इतकंच काय, मला रमी खेळताही येत नाही.”

“रमी खेळल्याचा आरोप खोटा, दोषी आढळल्यास थेट राज्यपालांना राजीनामा देईन”

ऑनलाइन रमी खेळण्यासाठी मोबाईल नंबर आणि बँक खातं लिंक करणं आवश्यक असतं. मात्र, माझा कोणताही मोबाईल नंबर किंवा बँक खाते अशा कोणत्याही अ‍ॅपशी जोडलेले नाहीत. मी माझी बँकेची खाती तपासणीसाठी देण्यास तयार आहे. कुठेही चौकशी करा – मी ऑनलाइन रमी सुरू झाल्यापासून आजपर्यंत एक रुपयाचीही रमी खेळलेली नाही. इतकंच काय, मला रमी खेळताही येत नाही. त्यामुळे माझ्यावर केलेला हा आरोप पूर्णतः खोटा आणि बिनबुडाचा आहे. माझा मोबाईल अँड्रॉईड तंत्रज्ञानाचा असून त्यात 5G सेवा आहे. कधी कधी स्क्रीनवर अनावधानाने टच झाल्यास भलतेच अ‍ॅप्स किंवा जाहिराती उघडतात. त्या वेळी रमीसारखा काही गेम स्क्रीनवर दिसला असेल, आणि तो स्किप करताना 10-15 सेकंद गेले असतील, एवढंच सगळं घडलं असावं — असा खुलासा कोकाटे यांनी केला. तसेच, ज्या राजकीय नेत्यांनी माझ्यावर आरोप करून बदनामी केली, त्यांच्याविरोधात मी न्यायालयात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार आहे, असा इशाराही कोकाटे यांनी दिला.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांना पत्र पाठवून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करणार आहे. आणि, “जर चौकशीत मी दोषी आढळलो, तर नागपूरच्या अधिवेशनात मुख्यमंत्री वा उपमुख्यमंत्र्यांना भेटण्याऐवजी मी थेट राज्यपालांना राजीनामा सादर करीन,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

व्हिडीओ प्रकरणावर कोकाटे भडकले – कोर्टात जाण्याचा इशारा

“राजीनामा द्यावा इतकं गंभीर नेमकं काय घडलं आहे?” असा सवाल उपस्थित करत माणिकराव कोकाटे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. “मी कुठला विनयभंग केला आहे का? चोरी केली आहे का? माझी पार्श्वभूमी गुन्हेगारी नाही. मग मी नक्की काय केलं आहे?” असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आणि हात वर करत आपल्या नाराजीचा खुला इशारा दिला. ते पुढे म्हणाले, “ज्या विरोधकाने हा व्हिडिओ रेकॉर्ड करून माझी बदनामी केली, त्याच्याविरोधात मी निश्चितच कोर्टात जाणार आहे.” “आजकाल साधा पाय घसरला तरी त्याचीही चर्चा होते आणि सोशल मीडियावर लगेच प्रतिक्रिया सुरू होतात. कोणी दारू प्याला असेल, कोणी गांजा घेतला असेल, अशा निराधार आणि विनाकारण प्रतिक्रिया येतात,” अशा शब्दांत कोकाटे यांनी आपली खंत व्यक्त केली.

“व्हिडीओचा एक भागच दाखवला, सत्य लपवलं जातंय” – कोकाटेंचा आरोप

“त्यावेळी माझी लक्ष्यवेधी सूचना होती. मला ओसडीकडून माहिती घेण्यासाठी एसएमएस किंवा फोन करावा लागतो. त्याच दरम्यान मी मोबाईल उघडला, आणि तेव्हाच तो गेम अचानक स्क्रीनवर आला. तो लगेच स्किप करता आला नाही. मोबाईल नवीन असल्याने स्किप करणारा पर्याय समोर दिसला नाही. काही गेम्स किंवा जाहिराती मोबाईल उघडल्यावर थेट स्क्रीनवर येतात आणि त्या लगेच स्किप होत नाहीत. त्यामुळे तो गेम स्क्रीनवर सुमारे 10-15 सेकंद दाखवला गेला,” असा खुलासा माणिकराव कोकाटे यांनी केला. “परंतु, त्या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ का दाखवला गेला नाही? जर पूर्ण व्हिडीओ दाखवला असता, तर सत्य काय आहे ते महाराष्ट्राच्या जनतेलाही समजले असते,” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

“कोर्टात, राज्यपालांकडे, आणि चौकशीस सामोरे जाणार” – कोकाटेंची तिहेरी तयारी

ते पुढे म्हणाले, “मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांना पत्र लिहून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करणार आहे. आणि जर चौकशीत मी दोषी आढळलो, तर नागपूरच्या अधिवेशनात मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांना न भेटता थेट राज्यपालांकडे राजीनामा सादर करीन,” अशी ठाम भूमिका कोकाटे यांनी मांडली. “माझ्या विरोधात अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार आहे. राज्यभर माझी बदनामी करण्यात आली. एखाद्या मंत्र्याची अशा प्रकारे सार्वजनिकपणे बदनामी करणे योग्य आहे का?” असा सवाल माणिकराव कोकाटे यांनी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, “या प्रकरणात चौकशी झालीच पाहिजे. चौकशीत जे सत्य आहे ते समोर येईल. तसेच कोणते नेते कोणाशी संपर्कात होते, यासंदर्भात संबंधित व्यक्तींचे सीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड) मागवण्याची विनंती मी करणार आहे.” “माझ्या कारकिर्दीत आजपर्यंत माझ्याविरोधात कोणताही गैरप्रकार आढळून आलेला नाही,” असेही कोकाटे यांनी ठामपणे स्पष्ट केले.

अर्थात –

ओला दुष्काळ, दुबार पेरणीचं संकट, कर्जबाजारीपणा, बोगस बियाण्यांची समस्या अशा गंभीर अडचणींमध्ये महाराष्ट्रातील शेतकरी अडकलेला असताना, राज्याचे कृषिमंत्री ऑनलाईन जुगार प्रकारात मोडणारा गेम खेळत असल्याचे चित्र समोर येते, हे अत्यंत दुःखद आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी नेमकं कोणाकडे पाहावं? असा संतप्त सवाल शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे. तसेच, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे याआधीही अनेक वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे यावर काय भूमिका घेतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top