जम्मू-काश्मीरमधील ‘भारताचे नंदनवन’ समजल्या जाणाऱ्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी मंगळवारी भ्याड हल्ला केला. सशस्त्र दहशतवाद्यांनी बैसारण परिसरात फिरणाऱ्या निष्पाप पर्यटकांवर गोळीबार करत थरकाप उडवून दिला. या हल्ल्यात आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महाराष्ट्रातील तिघांसह अनेक गैर-काश्मीरी पर्यटकांचा समावेश आहे.
हल्ल्याची पद्धत अमानवी, बळींची निवड धर्मावरून
हल्लेखोरांनी पर्यटकांची नावे, धर्म विचारून त्यानंतर आयडी तपासले. काही पर्यटकांना अमानवी वागणूक देत कपडे उतरवण्यास भाग पाडल्याचेही बचावलेल्या नागरिकांनी सांगितले. एका महिलेने सांगितले की, “बिगरमुस्लिम असल्यामुळे माझ्या पतीच्या डोक्यात गोळी झाडली गेली.” अनेक पर्यटकांनी मदतीसाठी टाहो फोडला.
मिनी स्वित्झर्लंडमध्ये नरसंहार
हल्ला बैसारण या स्थळी झाला, जे ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखले जाते. घनदाट पाइन जंगलांनी वेढलेला हा गवताळ भाग ट्रेकिंग व पिकनिकसाठी प्रसिद्ध आहे. हल्ल्यावेळी येथे पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गोळीबार सुरू होताच स्थानिकांनी सुरक्षितस्थळी आसरा घेतला, मात्र पर्यटक थेट दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आले.
थरारक अनुभव
महाराष्ट्राचे हरिस सोलिया हेही पहलगाममध्ये होते. त्यांनी सांगितले की, “आईस लेन भागात फिरण्यासाठी आम्ही गेलो होतो. माझ्यासोबत ज्येष्ठ नागरिक होते म्हणून मी खालीच थांबलो. वरच्या भागात गोळीबार झाला.” त्यांच्या अनुभवातून तिथल्या भयावहतेची कल्पना येते. गोळीबारानंतर संपूर्ण पहलगाममध्ये छावणीचे स्वरूप आले. चंदनवाडी ते पहलगाम ३० किलोमीटर अंतरावरील सर्व दुकाने बंद झाली. रस्त्यांवर रुग्णवाहिका, पोलीस व लष्करी ताफे दिसू लागले. काही स्थानिकांनी जखमी पर्यटकांना खांद्यावरून रस्त्यावर आणून मदतीसाठी धाव घेतली. या हल्ल्यात महाराष्ट्रातील तिघांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये पुण्याचे माणिक पाटील व एस. भालचंद्र यांचा समावेश आहे. एक जण गंभीर जखमी आहे.
हल्ल्याचा केंद्र सरकारकडून निषेध
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या असून हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने जम्मू-काश्मीर गाठले आहे. तपासासाठी सुरक्षा संस्था सज्ज झाल्या आहेत. सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार, या हल्ल्याची योजना आधीच आखण्यात आली होती. दहशतवाद्यांनी पूर्वनियोजित पद्धतीने रेकी केली होती. त्यांना स्थानिक ओव्हरग्राउंड वर्कर्सकडून शस्त्रे व लॉजिस्टिक मदत मिळाली होती. धार्मिक कारणांवरून गैर-काश्मिरी नागरिकांना लक्ष्य करणे हेच या हल्ल्याचे मुख्य उद्दिष्ट होते.
पुलवामा नंतरचा सर्वात मोठा हल्ला
२०१९ मधील पुलवामा हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यातला हा सर्वात मोठा हल्ला ठरला आहे. अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स भारत दौर्यावर असतानाच आणि अमरनाथ यात्रा सुरू होण्यापूर्वीच हा हल्ला घडल्याने सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.
अर्थात
निष्पापांवर गोळीबार करणाऱ्या दहशतवाद्यांच्या या अमानुष कृत्यामुळे देशभरातून संताप व्यक्त होत आहे. काश्मीरमधील शांतता आणि पर्यटनाचे चित्र पुन्हा एकदा धूसर झाले आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, अशा दहशतवादी संघटना आणि त्यांच्या कृत्यांना कठोर आणि योग्य तो प्रतिउत्तर द्यावे, अशी संपूर्ण भारतीयांची ठाम मागणी आहे.