पुणे जिल्ह्यातील राजकारण सध्या मोठ्या उलथापालथीच्या वाटेवर आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. पुणे जिल्ह्यात काँग्रेससाठी हा एक मोठा धक्का ठरू शकतो. थोपटे यांचा भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश लवकरच निश्चित होणार असून, रविवारी त्यांच्या प्रवेशाचा औपचारिक कार्यक्रम होणार आहे.
थोपटे कुटुंबीयांचा राजकीय वारसा
या मतदारसंघात एक जुनी म्हण आहे – ‘भोर म्हणजे थोपटे आणि थोपटे म्हणजे भोर’. थोपटे कुटुंबीयांनी गेल्या अनेक दशकांपासून भोरचा राजकीय गड काँग्रेससाठी कायम राखलेला होता. त्यामुळे संग्राम थोपटे यांचा भाजप प्रवेश म्हणजे केवळ एक व्यक्तीचा पक्षांतर नाही, तर एक संपूर्ण राजकीय समीकरणाचे परिवर्तन ठरणार आहे.
भोर तालुक्यात थोपटे कुटुंबीयांचा राजकीय वारसा अत्यंत समृद्ध आहे. संग्राम थोपटे हे भोर विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार राहिले आहेत, तर त्यांचे वडील अनंतराव थोपटे हे सहा वेळा आमदार होते आणि राज्याचे माजी शिक्षणमंत्री म्हणून देखील त्यांनी सेवा दिली होती. तब्बल १४ वर्षं ते राज्य मंत्रिमंडळात मंत्री होते. काँग्रेसच्या नेहमीच्या विश्वासू आणि निष्ठावान गटात त्यांचा समावेश होता.
विधानसभा निवडणुकीतील पराभव आणि खंत
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत संग्राम थोपटे यांचा पराभव झाला होता. त्यांना पराभूत केलं राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे उमेदवार शंकर मांडेकर यांनी. या पराभवानंतर थोपटे यांची पक्षातील नाराजी वाढली आणि त्यांनी काँग्रेसशी असलेल्या नात्याला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतल्याची जोरदार चर्चा सुरू झाली.
राजगड साखर कारखान्याची अडचण –
संग्राम थोपटे हे राजगड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत. हा कारखाना अलीकडे अडचणीत सापडला असून, राज्य सरकारने मंजूर केलेली ८० कोटींची मदत नंतर मागे घेण्यात आली. लोकसभा निवडणुकीवेळी थोपटे यांनी सुप्रिया सुळे यांना मदत केली होती, ज्यामुळे सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. या पार्श्वभूमीवर, अजित पवार यांच्या दबावामुळे मदत थांबवल्याचा आरोपही राजकीय वर्तुळात होतो आहे. कारखान्याला पुन्हा आर्थिक मदत मिळावी, यासाठीही थोपटे भाजपच्या वाटेवर असल्याचे म्हटले जाते.
पवार कुटुंबीयांशी चार दशकांचा संघर्ष
थोपटे आणि पवार कुटुंबीयांमधील राजकीय संघर्ष नविन नाही. संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे यांच्या नावाची एकेकाळी मुख्यमंत्रिपदासाठी चर्चा होती. मात्र, शरद पवार यांच्या डावपेचामुळे त्यांना ती संधी मिळाली नाही, अशी चर्चा जुनी आहे. त्यामुळे दोन्ही घराण्यांमध्ये तणावाचे संबंध होते. मात्र, सुप्रिया सुळे यांचा विजय निश्चित करण्यासाठी लोकसभा निवडणुकीत दोघांमध्ये तात्पुरती हातमिळवणी झाली होती.
ही आत्मघातकी कृती ठरेल – हर्षवर्धन सपकाळ
संग्राम थोपटे यांच्या निर्णयावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलं की, “त्यांनी संघर्षाचा वारसा जोपासावा हीच अपेक्षा होती. मात्र आत्मघातकी निर्णय घेऊ नये. हा निर्णय चुकीचा संदेश देणारा ठरेल.”
महाविकास आघाडी सरकारच्या काळात, नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या विधानसभा अध्यक्षपदासाठी संग्राम थोपटे यांचे नाव आघाडीवर होते. काँग्रेसने त्यांना पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली होती. पण भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर आडवा हात आणल्याने ही संधीही हुकली. हा प्रसंग थोपटे यांच्या नाराजीस कारणीभूत ठरल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सांगतात.
भाजप प्रवेशाची चर्चेला गती
पराभवानंतर संग्राम थोपटे यांनी पक्षात सक्रियता कमी केली होती आणि काही दिवसांतच त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चा रंगू लागल्या. नुकतीच त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. ही भेट त्यांच्या निर्णयासाठी निर्णायक ठरली असावी. भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याच्या पुढाकाराने त्यांचा पक्षप्रवेश निश्चित झाला आहे.
कार्यकर्त्यांशी सल्लामसलत
भाजप प्रवेशाच्या अगोदर संग्राम थोपटे यांनी आपल्या कार्यकर्त्यांची खास बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना त्यांच्या निर्णयाची माहिती दिली आणि भावनिक संवाद साधला. काही कार्यकर्त्यांनी याला पाठिंबा दर्शवला, तर काहींनी संयमित भूमिका घेतली. मात्र, बहुसंख्य कार्यकर्ते त्यांच्यासोबतच नव्या राजकीय प्रवासात सहभागी होणार आहेत, हे स्पष्ट झाले.
अर्थात –
संग्राम थोपटे यांचा भाजप प्रवेश म्हणजे केवळ एका नेत्याचे पक्षांतर नाही, तर पुणे जिल्ह्यातील काँग्रेसच्या अस्तित्वासाठी गंभीर आव्हान आहे. भोरसारखा पारंपरिक काँग्रेस गड जर भाजपच्या खात्यात गेला, तर या जिल्ह्यात राजकीय समीकरणं पूर्णतः बदलण्याची शक्यता आहे. पुढील काळात थोपटे यांचा राजकीय प्रवास काय वळण घेतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.