पुण्यात भाजपच्या वर्चस्वाला धक्का देणारा काँग्रेसचा बडा नेता महायुतीच्या वाटेवर ?

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांपासून एक नाव वारंवार चर्चेत येत आहे, आणि ते म्हणजे रवींद्र धंगेकर. पुण्याच्या राजकारणात चांगले परिचित असलेले धंगेकर २०२३ मध्ये झालेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत चर्चेचा विषय बनले. भाजपच्या गडावर काँग्रेसचा झेंडा फडकवणाऱ्या धंगेकरांनी ‘हू इज धंगेकर?’ या प्रश्नाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आज त्यांचे नाव ‘व्हेअर इज धंगेकर?’ या प्रश्नात परावर्तित झाले आहे.

पोटनिवडणुकीतील ऐतिहासिक विजय
२०२३ साली पुण्याच्या कसबा मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या २७ वर्षांच्या वर्चस्वाला धक्का दिला. या निवडणुकीत भाजपकडून हेमंत रासने आणि काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर हे दोन प्रमुख उमेदवार होते. या प्रतिष्ठेच्या लढाईत धंगेकरांनी हेमंत रासने यांचा पराभव केला होता. या विजयानंतर त्यांनी पुण्यातील राजकारणात आपलं स्थान मजबूत करण्यास प्रारंभ केला.

राजकीय प्रसिद्धी आणि वाद
रवींद्र धंगेकर यांच्या राजकीय कारकिर्दीला पुण्यातील ड्रग्ज प्रकरण आणि पोर्शे कार दुर्घटना यांसारख्या मुद्द्यांमुळे देशभर प्रसिद्धी मिळाली. त्यांचा थेट आणि आक्रमक शैलीने त्यांना सर्वांचे लक्ष आकर्षित करणे सोपे केले. महापालिका आयुक्तापासून पंतप्रधान नरेंद्र मोदीपर्यंत त्यांनी अनेक नेत्यांवर आपल्या खास शैलीत टीका केली. या थेट पद्धतीमुळे धंगेकर अल्पवधीत काँग्रेसच्या राज्यातील प्रमुख चेहऱ्यांपैकी एक बनले.

लोकसभा निवडणुकीतील पराभव
रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेस ची उमेदवारी मिळवून लोकसभा निवडणुकीत भाग घेतला, परंतु अंतर्गत गटबाजी आणि पक्षातील असहमतीमुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मुरलीधर मोहोळ यांच्याकडून त्यांचा पराभव झाला, आणि त्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळवून आपली लढाई तशीच सुरु ठेवली होती. परंतु विधानसभा निवडणुकीत देखील त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

शिवसेना ते काँग्रेस व्हाया मनसे असा राजकीय प्रवास
रवींद्र धंगेकरांचा राजकीय प्रवास शिवसेनेपासून सुरू झाला. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेने प्रेरित होऊन त्यांनी १९९७ मध्ये कसब्यात शिवसेनेची शाखा स्थापन केली. १९९७ च्या महानगरपालिका निवडणुकीत नागवरसेवक म्हणून निवडून आले. २००६ मध्ये राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करून त्यांनी २००९ मध्ये कसबा मतदारसंघात भाजपच्या गिरीश बापटांना कडवी टक्कर दिली होती परंतु त्यांचा पराभव झाला. २०१४ मध्ये मोदी लाटेमध्ये मनसेतून पराभव स्वीकारल्यानंतर रवींद्र धंगेकर मनसेतून बाजूला झाले. पक्षाच्या धोरणांपासून असंतुष्ट होऊन त्यांनी २०१७ मध्ये महापालिका निवडणूक अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतला. यावेळी काँग्रेसने त्यांना अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला, आणि धंगेकर काँग्रेसच्या पाठिंब्यावर महापालिकेत विजयी झाले.

काँग्रेसमध्ये वाढती प्रतिष्ठा आणि विरोध
काँग्रेसमध्ये रवींद्र धंगेकरांची प्रतिष्ठा वाढत असताना, त्यांच्या विरोधकांची संख्या देखील वाढू लागली. अरविंद शिंदे गटाने कसबा मतदारसंघात आपली सक्रियता वाढवली. धंगेकर यांची उपस्थिती त्यांना अनुकूल ठरली नाही. याशिवाय, धंगेकरांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी वारंवार भेटी घेतल्या.

पक्ष बदलण्याची तयारी
धंगेकरांच्या राजकीय प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे पक्ष बदलण्याची तयारी. त्यांनी प्रथम शिवसेनेत प्रवेश केला, त्यानंतर मनसेत दाखल झाले आणि नंतर काँग्रेसमध्ये सामील झाले. आता शिंदेसेनेशी जवळीक साधत, त्यांची राजकीय दिशा पुन्हा एकदा बदलू शकते. त्यांच्या ‘पक्ष बदलण्याच्या पॅटर्न’ने सध्या राज्याच्या राजकारणात एक चर्चेचा विषय निर्माण केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top