दिल्ली चे सरकार “लाडकी बहीण” चालवणार !

दिल्लीमध्ये 27 वर्षांनी सत्ता परत मिळवणाऱ्या भाजपाने नवा मुख्यमंत्री जाहीर केला आहे. रेखा गुप्ता यांची दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे. त्या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री आहेत. यापूर्वी सुषमा स्वराज (भा.ज.पा.), शिला दीक्षित (काँग्रेस) आणि आतिषी (आम आदमी पक्ष) या महिलांनी मुख्यमंत्री पद भूषवले आहे.

रेखा गुप्ता यांची निवड
दिल्लीतील भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत रेखा गुप्ता यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्या शालीमार बाग विधानसभा मतदारसंघातून आमदार निवडून आल्या आहेत. 50 वर्षांच्या रेखा गुप्ता यांची ही आमदारकीची पहिलीच टर्म आहे. यापूर्वी त्या दक्षिण दिल्ली नगर निगमच्या महापौर होत्या.

रेखा गुप्ता यांचा जन्म व शिक्षण
रेखा गुप्ता यांचा जन्म 1974 साली हरियाणातील जिंद जिल्ह्यात झाला. दोन वर्षांच्या असताना त्यांचे कुटुंब दिल्लीला स्थायिक झाले. त्यांचे वडील स्टेट बँकेत मॅनेजर होते. रेखा गुप्ता यांनी दिल्लीमध्येच आपले शिक्षण पूर्ण केले. कॉलेज जीवनातच त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सक्रिय सहभाग घेतला होता. दिल्ली विद्यापीठाच्या सचिव म्हणूनही त्यांनी काम केले आहे. रेखा गुप्ता यांना दिल्ली भाजपाच्या सरचिटणीस आणि भाजपाच्या महिला मोर्चाच्या उपाध्यक्षपदावर देखील काम करण्याचा अनुभव आहे.

त्यांनी 1993 मध्ये दौलत राम कॉलेजमधून बॅचलर ऑफ कॉमर्सची पदवी घेतली, आणि 2022 मध्ये चौधरी चरण सिंग विद्यापीठातून एलएलबीची पदवी मिळवली. वकील असलेल्या रेखा गुप्ता भाजपामध्ये अनेक वर्षांपासून सक्रिय कार्यरत आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत रेखा गुप्ता यांनी शालीमार बाग मतदारसंघातून विजय मिळवला. त्यांनी आम आदमी पक्षाच्या वंदना कुमारी यांचा पराभव केला. रेखा गुप्ता यांना 68,200 मते मिळाली, तर वंदना कुमारी यांना 38,605 मते मिळाली होती.

 

 

शपथविधीचा समारंभ
20 फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानावर रेखा गुप्ता यांनी मुख्यमंत्रीपदी शपथ घेतली. या समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, तसेच इतर महत्त्वाचे नेते आणि राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार देखील यावेळी उपस्थित होते. रेखा गुप्ता यांच्याबरोबरच अरविंद केजरीवाल यांचा पराभव करणाऱ्या प्रवेश वर्मा यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्याचप्रमाणे अन्य सहा कॅबिनेट मंत्र्यांनी देखील शपथ घेतली.

दिल्लीतील रामलीला मैदानावर शपथविधी सोहळा
आज दिल्लीतील रामलीला मैदानावर दुपारी 12:35 वाजता शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि एनडीएचे अन्य सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित होते. रेखा गुप्ता यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. रेखा गुप्ता यांच्यासह सहा नेत्यांनी मंत्रिमंडळाची शपथ घेतली. प्रवेश वर्मा, आशिष सूद, मनजिंदर सिंग सिरसा, कपिल मिश्रा, रवींद्र इंद्रराज आणि पंकज सिंग या नेत्यांनी मंत्रिमंडळात स्थान घेतले. यामुळे रामलीला मैदानावर एकूण सहा मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला.

प्रवेश वर्मा
प्रवेश वर्मा हे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंग वर्मा यांचे सुपुत्र आहेत. प्रवेश वर्मा यांनी आरके पुरम येथील दिल्ली पब्लिक स्कूलमधून शालेय शिक्षण घेतले आणि नंतर किरोरीमल कॉलेजमधून कला शाखेत पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांचा 4,000 पेक्षा अधिक मतांनी पराभव केला.

मनजिंदर सिंग सिरसा
भाजपाने राजौरी गार्डन विधानसभा मतदारसंघातून मनजिंदर सिंग सिरसा यांना उमेदवारी दिली होती. मनजिंदर सिंग यांनी 18,190 मते मिळवून ही जागा जिंकली. भाजपमध्ये येण्यापूर्वी ते शिरोमणी अकाली दलाच्या सदस्य होते. 2021 मध्ये अकाली दलाला रामराम करत त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि आता दिल्लीच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवले.

कपिल मिश्रा
कपिल मिश्रा हे विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर आम आदमी पार्टी सोडून भाजपात सहभागी झाले. त्यांनी करावल नगर मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजयी झाले. कपिल मिश्रा यांना हिंदू नेते म्हणून ओळखले जाते. त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या आंबेडकर कॉलेजमधून समाजकार्यात बीए आणि नंतर एमए केले आहे.

आशिष सूद
जनकपुरी मतदारसंघातून निवडून आलेले आशिष सूद यांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली. दिल्लीतील पंजाबी समाजात ते एक महत्त्वपूर्ण चेहरा मानले जातात. आशिष सूद हे पहिल्यांदाच आमदार झाले आहेत आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून झाली आहे. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचे मानले जातात.

रवींद्र इंद्रराज सिंह
भाजपाने दलित नेते रवींद्र इंद्रराज सिंह यांना मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. रवींद्र इंद्रराज सिंह यांनी बवाना विधानसभा मतदारसंघातून मोठा विजय मिळवला होता. त्यांनी आम आदमी पक्षाच्या जय भगवान उपकर यांचा 31,475 मतांनी पराभव केला. ते पहिल्यांदाच बवाना राखीव जागेवरून आमदार झाले आहेत.

पंकज सिंह
पंकज सिंह यांनी पहिल्यांदाच विकासपुरी मतदारसंघातून भाजपला पहिला विजय मिळवून दिला. त्यांनी आपचे महेंद्र यादव यांना 12,876 मतांनी पराभव केला. पंकज सिंह हे पूर्वांचलचे ठाकूर आहेत, आणि त्यांच्या माध्यमातून भाजपने पूर्वांचल समाजाला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, भाजपाने मुख्यमंत्री म्हणून एका महिलेला संधी दिली असली तरी मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान न दिल्याबद्दल चर्चा होत आहे.


आरएसएसच्या सुचनेनंतर मुख्यमंत्रिपदी निवड
रेखा गुप्ता यांची मुख्यमंत्रीपदी निवड राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) सुचनेनुसार करण्यात आली आहे. आरएसएसने महिला मुख्यमंत्रीच्या प्रस्तावाची शिफारस केली होती, आणि भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्त्वाने त्यास मान्यता दिली. त्यानंतर आमदारांच्या बैठकीत त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top