देशभरात कोरोना विषाणूने, विशेषत: चीनमध्ये, मोठा गोंधळ निर्माण केला होता. अजूनही कोरोना पूर्णपणे संपलेला नाही, आणि आता आणखी एक नवीन विषाणू पसरू लागला आहे. सध्या, चीनमध्ये HMPV (Human Meta Pneumo Virus) या विषाणूचा प्रचंड उद्रेक झाला आहे. या विषाणूचा प्रभाव वेगाने वाढत असून, चीनमधील रुग्णालयांमध्ये ह्या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सोशल मीडियावर चीनमधील परिस्थितीचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये HMPV विषाणूने किती गंभीर परिणाम केले आहेत, हे दिसून येते. रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी बेड्सचा तुटवडा निर्माण झाला आहे. Independent.co.uk या वेबसाइटनुसार, चीनी आरोग्य अधिकाऱ्यांनी या विषाणूच्या नियंत्रणासाठी काही प्रोटोकॉल लागू केले आहेत, तरीही कोणतीही आपत्कालीन स्थिती अधिकृतपणे जाहीर केलेली नाही.
२००१ मध्ये ओळख, १९५८ मध्ये देखील पसरल्याचा दावा
मानवी मेटाप्युमोव्हायरस (HMPV) हा एक नवीन विषाणू नाही. याची ओळख २००१ मध्ये २३ वर्षांपूर्वी झाली होती, परंतु काही शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की हा विषाणू किमान १९५८ मध्येही पसरला होता. त्यानंतर यावर योग्य लक्ष दिले गेले नाही आणि त्यावर फारसा संशोधन देखील झालेले नाही. Independent.co.uk वेबसाइटनुसार, Human Metapneumovirus (HMPV) हा RNA व्हायरस आहे, जो Pneumoviridae कुटुंबाशी संबंधित आहे. हा विषाणू श्वसन संक्रमण निर्माण करतो, ज्याची लक्षणे सामान्यतः सर्दीसारखी असतात. हा रोग सहसा सौम्य असतो, परंतु त्यामुळे न्यूमोनिया सारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. ब्रिटिश वेबसाइटच्या मते, लहान मुले, वृद्ध आणि ज्यांचे प्रतिकारशक्ती कमी आहे, अशा व्यक्तींना HMPV विषाणूचा सर्वाधिक धोका असतो.
“घाबरू नका, पण सावध राहा”
चीनमधील HMPV विषाणूच्या प्रकोपामुळे महाराष्ट्रातील आरोग्य विभागानेही सतर्कतेची पावलं उचलली आहेत. नागरिकांना “घाबरू नका, पण सावध राहा” असा सल्ला देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर, सर्दी आणि खोकल्याच्या रुग्णांचे नियमित सर्वेक्षण करण्याचे आदेश आरोग्य विभागाने अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच, स्वच्छतेच्या नियमांचे पालन करण्याचे आदेश देखील दिले आहेत.
HMPV ची लक्षणे:
- श्वासोच्छ्वासात अडचण
- सतत खोकला
- नाक वाहणे
- ताप येणे
- घसा खवखवणे
- ब्रॉन्कायटिस आणि न्यूमोनिया होऊ शकतो.
एचएमपीव्ही विषाणूच्या संसर्गादरम्यान काळजी कशी घ्यावी ?
सुरुवातीला सर्दी-खोकला झाल्यास, अँटीबायोटिक्सची आवश्यकता नाही. त्याऐवजी पूर्ण आराम आणि गर्दी टाळणे आवश्यक आहे. खोकला जास्त वाढल्यास, ताप जास्त असल्यास किंवा श्वासोच्छ्वासात त्रास होत असल्यास, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल व्हावे. अन्यथा, या आजारात अँटीबायोटिक्सची गरज नाही. विश्रांती घेणे, भरपूर पाणी पिणे आणि योग्य काळजी घेणे यामुळे हा आजार बरा होऊ शकतो.
2001 पासून या आजाराची माहिती असल्यामुळे त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून श्वसनसंस्थेशी संबंधित आजारांची काळजी घेतली जाते. 65 वर्षांहून अधिक वय असलेल्या व्यक्ती, लहान मुले, रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या लोकांसह, एचआयव्ही असणाऱ्या व्यक्तींसाठी हा आजार अधिक घातक ठरू शकतो. कोरोनाच्या तुलनेत, सुरुवातीपासूनच या आजारात ऑक्सिजनची पातळी कमी होण्याची शक्यता कमी आहे, त्यामुळे धोका तुलनेने कमी आहे. तरीही, घाबरण्याची आवश्यकता नाही. चांगल्या पद्धतीने काळजी घेतल्यास, जसे की मास्क वापरणे, हात स्वच्छ धुणे आणि गर्दीमध्ये जाणे टाळणे, यामुळे या विषाणूचा प्रसार रोखता येईल.
तज्ज्ञांच्या मते …
IMA चे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनमधून पसरलेला कोरोना आणि सध्या भीती निर्माण करणारा एचएमपीव्ही व्हायरस यांची तुलना करणे योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. “हा विषाणू वेगाने पसरत असला तरी तो इतका घातक नाही आणि त्याचा मृत्यूदर खूपच कमी आहे. त्यामुळे, तो वेगाने पसरत असला तरी त्याचा मृत्यूदर फारसा वाढत नाही. २००१ मध्येच वैद्यकीय क्षेत्राने या विषाणूचे आयसोलेशन केले होते. त्यानंतर अनेक देशांमध्ये या विषाणूच्या साथी आले, परंतु त्याचे महामारीत रूपांतर झाले नाही. त्यामुळे, सध्याही महामारी होण्याची शक्यता आहे, पण मृत्यूदर कमी असल्यामुळे घाबरण्याची आवश्यकता नाही,” असे डॉ. अविनाश भोंडवे यांनी सांगितले.
डब्ल्यूएचओने दिली महत्त्वाची माहिती
“हिवाळ्यात श्वासोच्छवासाच्या आजारांमध्ये वाढ होणे हे सामान्य आहे. एचएमपीव्ही हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे, जो हिवाळा आणि वसंत ऋतूमध्ये अनेकदा पसरतो. मात्र, सर्व देश यासंदर्भात नियमितपणे एचएमपीव्हीचे डेटा तपासत नाहीत आणि प्रकाशितही करत नाहीत. डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार, श्वासोच्छवासाच्या संसर्गात वाढ विशेषत: चीनच्या उत्तरेकडील प्रांतांमध्ये दिसून आली आहे. श्वासोच्छवासाच्या संसर्गामध्ये झालेली वाढ मर्यादित असून, चीनच्या अधिकाऱ्यांनी याबाबत पुष्टी केली आहे. त्याचबरोबर, चीनमधील रुग्णालयांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी रुग्ण दाखल झाले आहेत. तसेच, कोणतीही आपत्कालीन घोषणा करण्यात आलेली नाही”, असे डब्ल्यूएचओने आपल्या अहवालात म्हटले आहे.
डब्ल्यूएचओने आपल्या अहवालात म्हटले आहे की, “डब्ल्यूएचओ चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. तसेच, एचएमपीव्ही विषाणूबाबत कोणतीही आपत्कालीन घोषणा करण्यात आलेली नाही. डब्ल्यूएचओची टीम जागतिक, प्रादेशिक आणि देश पातळीवर श्वासोच्छवासाच्या संसर्गावर लक्ष ठेवून आहे. अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की, सध्या हिवाळा सुरू आहे आणि श्वसन संसर्गापासून बचाव करण्यासाठी सावधगिरी बाळगली पाहिजे. गंभीर आजार असलेल्या लोकांनी शक्य तितक्या लवकर वैद्यकीय मदत घ्यावी.”