विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं, तर महाविकास आघाडीला मोठं अपयश समोर आलं. निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं, तर दुसरीकडे महाविकास आघाडीला अपयश का आलं, याचं विश्लेषण नेत्याांकडून सुरू आहे. त्याचवेळी, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जवळपास सर्व राजकीय पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारीला लागले आहेत.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचं सूचित केलं होतं. पण याचदरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाला एक मोठा धक्का बसला आहे. छत्रपती संभाजीनगरचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी महापौर व माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे निकटवर्तीय नंदकुमार घोडेले हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहे. त्यामुळे ठाकरे गटासाठी हा धक्का मानला जात आहे.
शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे नंदकुमार घोडेले यांचे मत
“आम्ही जवळपास ३० वर्षांपासून शिवसेनेत कार्यरत आहोत. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यात जे कार्य झाले आहे, त्यामुळे आम्ही प्रभावित होऊन शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहोत. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्ववादी भूमिका सोडली, हे मला योग्य वाटले नाही. काँग्रेससोबतची युती त्या निर्णयाचा परिणाम झाला असावा. भविष्यात नागरिकांची कामे करण्यासाठी सत्ता हवीच असते, म्हणून आम्ही शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. ठाकरे गटातील कोणाशीही माझा वैयक्तिक वाद नाही, पण शिंदे गटात जाऊन अधिक कार्य करण्याची संधी मिळेल, असे मला वाटते,” असे नंदकुमार घोडेले यांनी सांगितले.
नंदकुमार घोडेले कोण आहेत ?
नंदकुमार घोडेले हे शिवसेनेचे एकनिष्ठ आणि प्रतिष्ठित नेते म्हणून ओळखले जातात. ते छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर देखील राहिले आहेत. त्यांच्या पत्नी, अनिता घोडेले, या देखील महापौर पदावर कार्यरत होत्या. घोडेले हे शिवसेनेचे सशक्त नेते, चंद्रकांत खैरे यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे सहकारी मानले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्त्वाच्या योजनांचे कार्यान्वयन करण्यात आले आहे. शिवसेनेतील त्यांच्या योगदानामुळे ते स्थानिक स्तरावर खूप प्रभावशाली नेता मानले जातात, आणि त्यांच्या निर्णयाचा राज्याच्या राजकारणावर मोठा प्रभाव पडू शकतो.
आता, त्यांच्या शिंदे गटात प्रवेशाच्या चर्चांमुळे राजकारणात एक नवा वळण येऊ शकतो. यामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाला आगामी महापालिका निवडणुकीत एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. नंदकुमार घोडेले यांचा शिंदे गटात प्रवेश झाल्याने काय बदल होईल, हे काळच सांगेल.
नंदकुमार घोडेले यांच्या शिंदे गटात प्रवेशावर चंद्रकांत खैरे यांची टीका
माजी महापौर नंदकुमार घोडेले आज शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या संदर्भात माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “नंदकुमार घोडेले यांना शिवसेना ठाकरे गटाने छत्रपती संभाजीनगर शहराचं महापौरपद दिलं होतं. मात्र, आता ते स्वार्थाच्या कारणामुळे शिंदे गटात गेले आहेत. त्यांना शिंदे गटात जाऊन काय मिळणार? जो मान आणि सन्मान इथे होता, तो तिकडे त्यांना मिळणार नाही,” असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं.
नंदकुमार घोडेले यांच्या शिंदे गटात प्रवेशावर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया
माजी महापौर नंदकुमार घोडेले आज शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या संदर्भात अंबादास दानवे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, “संघटना एक प्रक्रिया आहे, आणि ती प्रक्रिया कायम सुरु असते. जसे काही लोक संघटनेतून बाहेर गेले आहेत, तसेच अनेक लोक संघटनेत आले आहेत. काही लोकांना कमी वेळेत जास्त गोष्टी मिळवायच्या असतात, मात्र प्रत्येकाने त्यापूर्वी मिळालेल्या पदांचा विचार केला पाहिजे,” असे अंबादास दानवे यांनी सांगितले.