२०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली. ४० आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा दिला. निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या गटाला खरी राष्ट्रवादी काँग्रेस मान्यता दिली असली, तरी हे प्रकरण अजूनही न्यायप्रविष्ट आहे. विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळवल्यानंतर, अजित पवार यांनी आता दिल्ली विधानसभेवर लक्ष केंद्रीत केले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार गटाने त्यांचे पहिले ११ उमेदवार जाहीर केले. फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या या निवडणुकीसाठी अजित पवारांनी एक मास्टर प्लॅन तयार केल्याचे सांगितले जात आहे.
‘नागालँड आणि अरुणाचलनंतर दिल्लीतही यश मिळवू’ – प्रफुल पटेल
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, “महाराष्ट्रापूर्वी आम्ही नागालँडमध्येही यश मिळवले होते. आमचा उपाध्यक्ष तिथे आहे. अरुणाचल प्रदेशातही तीन आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे आम्हाला तीन राज्यांमध्ये यश मिळाले आहे. पुढे देखील आम्हाला यश मिळवायचं आहे. आता आम्हाला दिल्लीतील निवडणूक लढायची आहे. आम्ही इथे आपलं खाते नक्कीच उघडू आणि लवकरच राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देखील मिळवणार आहोत. आम्ही सतत पुढे जात राहू आणि यश प्राप्त करू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महिलांना आणि तरुणांना संधी, ईव्हीएमवर शंका निराधार – अजित पवार
अजित पवार यांनी दिल्लीत माध्यमांशी बोलताना सांगितले की, “प्रत्येक राज्यात आम्ही आमचे आमदार निवडून आणत आहोत. महिलांना कशी संधी दिली जाऊ शकते, यावरही आमचा भर असणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही, पण आमच्या कार्यकर्त्यांनी हार मानली नाही. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आम्ही आपले उमेदवार 1 लाख 80 हजार मतांच्या मार्जिनने जिंकलो. आता विरोधक ईव्हीएममध्ये घोटाळा असल्याचा आरोप करत आहेत. पण लोकसभेतील निवडणुकीत याबाबत काही शंका नव्हती. आता विधानसभेतील अपयशामुळे ते ईव्हीएमवर शंका उपस्थित करत आहेत. पण आम्हाला आपल्या पक्षाचा मार्ग पुढे नेण्यात काहीच अडचण नाही. आम्ही राष्ट्रीय दर्जा पुन्हा मिळवणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन डिसेंबर नंतर होणार आहे. त्याआधी आवश्यक बदल करायला आम्ही सज्ज आहोत. आम्ही तरुणांना आणि महिलांना संधी देणार आहोत. आज मुख्यमंत्री ठरवण्यासाठी बैठक आहे. भाजपची जागा जास्त असल्याने, भाजपचे वरिष्ठ नेते नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे नेतृत्व या निर्णयावर मार्गदर्शन करेल,” असे अजित पवार यांनी म्हटले.
दिल्ली विधानसभेतील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारांची नावे –
१. रतन त्यागी – बुरारी मतदारसंघ
२. मुलायम सिंह – बदली मतदारसंघ
३. खेम चंद – मंगलोपुरी
४. खलिदुर रहमान – चांदनी चौक
५. मोहम्मद हारून – बल्लीमारन
६. नरेंद्र तन्वर – छतरपूर
७. कमर अहमद – संगम विहार
८. इम्रान सैफी – ओखला
९. नमाहा – लक्ष्मीनगर
१०. राजेश लोहिया – सीमापुरी
११. जगदीश भगत – गोकुळपुरी
धार्मिक समीकरणावर लक्ष केंद्रित करून उमेदवार निवड
अजित पवार यांच्या पहिल्या उमेदवार यादीत धार्मिक समीकरणावर विशेष लक्ष दिले गेले आहे. दिल्लीतील धार्मिक समीकरणांचा विचार करून, या यादीत चार मुस्लिम उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय दर्जा मिळवण्यासाठी ही रणनीती तयार केली असल्याचे समजते. पक्षात फूट पडल्यामुळे राष्ट्रीय दर्जा गमावला होता, आणि आता तो दर्जा पुन्हा मिळवण्यासाठी अजित पवार गटाने एक मास्टर प्लॅन तयार केला आहे,अशी चर्चा माध्यमांमधून दिसून येते
ष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी लागणाऱ्या अटी आणि शर्ती
१. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी राजकीय पक्षाकडे तीन राज्यांमध्ये लोकसभेच्या २ टक्के जागा असाव्यात. म्हणजेच, त्या तीन राज्यांतून मिळवून लोकसभेत किमान ११ खासदार निवडून आले पाहिजे.
२. एखाद्या राजकीय पक्षाला चार राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळाल्यास, त्याला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला जातो. प्रादेशिक पक्षाचा दर्जा मिळवण्यासाठी, त्या पक्षाला विधानसभा निवडणुकीत किमान ६ टक्के मतं किंवा २ जागा निवडून आणणं आवश्यक आहे. ६ टक्क्यांपेक्षा कमी मतं मिळाल्यास, त्या पक्षाला किमान ३ उमेदवार निवडून आणावं लागतात.