कुदळ-फावड्याच्या कामात असणारा एकमेव आमदार

महाराष्ट्रातील या गरीब आमदारकडे फक्त 51 हजार रुपयांची संपत्ती आहे. या आमदाराने भाजपच्या उमेदवाराला दोन वेळा पराभूत केले आहे. तुम्हाला माहीत आहे का की महाराष्ट्रातील सर्वात गरीब आमदार कोण आहेत? चला तर, जाणून घेऊया हा आमदार कोण आहेत.

महाराष्ट्रातील सर्वात गरीब आमदार आहेत विनोद भिवा निकोले. ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महाराष्ट्रातील एकमेव उमेदवार आहेत. डहाणूमध्ये विनोद भिवा निकोले हे एक संघर्षशील कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांची कथा केवळ राजकारणाशी संबंधित नाही, तर जीवनातील कठीण प्रसंगांचा सामना करत उभं राहण्याची आहे. आज ते आमदार असताना देखील कधी कुदळ-फावड्याने बागेत काम करताना दिसतात.

गरीब कुटुंबातून उभं राहिलेलं नेतृत्व

विनोद निकोले यांचा मूळगाव डहाणू तालुक्यातील उर्से हे छोटेसे गाव आहे, आणि ते एक अत्यंत गरीब कुटुंबातून येतात. त्यांच्या आई-वडिलांनी मोलमजुरी करून त्यांना शिक्षण दिलं. त्यांचे प्राथमिक शिक्षण आशागड येथील चौथी इयत्तेपर्यंत झाले. त्यानंतर त्यांनी कोसबाड आणि डहाणू इथे पुढील शिक्षण घेतलं. गरिबीतून आलेले विनोद, महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाही समाजाप्रती आपली जबाबदारी लक्षात ठेवून काम करत होते. कुटुंबाचे पालन-पोषण करण्यासाठी विनोद निकोले यांनी डहाणूच्या इराणी रोडवरील वैभव कॉम्प्लेक्समध्ये एक टपरी सुरू केली, जिथे ते वडापाव आणि चहा विकायचे. एसवायबीएपर्यंत शिक्षण घेत असलेल्या विनोदांना समाजकार्याची आवड लहानपणापासून होती. त्यांच्या टपरीवर माकपचे बुजूर्ग कार्यकर्ते एल. बी. धनगर यायचे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली विनोद निकोले माकपचे सदस्य झाले.

आमदार विनोद निकोले मीडियाशी बोलताना सांगतात, “काम सुरू केल्यानंतर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून 500 रुपयांचं मानधन मिळायला लागलं. त्या काळात मी पायीच फिरायचो. डहाणूमध्ये एक व्यापारी होते, ज्यांनी मला सहानुभूती दाखवली. त्यांनी मला त्यांची जुनी मोटरसायकल दिली, जी मी दुरुस्त केली. जवळपास पंधरा-वीस वर्षं, म्हणजे आमदार होईपर्यंत, मी त्याच मोटरसायकलवरून काम करत होतो.”

साध्या कुटुंबातून आमदार होण्यापर्यंतचा संघर्ष

विनोद निकोले यांचा संघर्ष अत्यंत साधा आणि प्रेरणादायक आहे. एकेकाळी ज्यांचे बँक खातंही नव्हतं, त्यांना उमेदवारी मिळाल्यानंतर बँकेत खाती उघडावी लागली. ते सांगतात, “2010 मध्ये मी लग्न केलं. उमेदवारी मिळाल्यावर माझं बँक अकाउंट नव्हतं. कारण दोन-अडीच हजार रुपयांमध्ये कसं जगायचं, हेच समजत नव्हतं.” आमदार होईपर्यंत, विनोद निकोले यांना स्वतःचं घर नव्हतं. सुरुवातीला ते एका साध्या कुडाच्या घरात राहायचे, आणि नंतर त्यांनी पत्र्याचं छोटंसं घर बांधलं. ते सांगतात, “आधी कुडाचं घर होतं, नंतर पक्षाने पगारातून काही रक्कम दिली आणि आम्ही घर बांधायला सुरुवात केली. खड्डे काढणे, माती भरावणे, हे सगळं काम आम्हीच केलं.”

पक्षाच्या कामामुळे विनोद निकोले यांना डहाणू आणि मुंबई यामध्ये सतत प्रवास करावा लागायचा. त्यांचे मित्र कृष्णा कुवरा सांगतात, “चार वाजता उठून कामाला लागायचं, रात्री दीड वाजता घरी परतायचं. समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्याची ही स्थिती खूप वाईट आहे.” मुंबईत आमदार निवास मिळवण्यासाठी सरकारने काही योजना तयार केल्या असल्या तरी, त्या विनोद निकोले यांना परवडत नाहीत. ते म्हणतात, “मुंबईत घर घ्यायचं ठरवलं तरी, सत्तर लाख रुपये मी देऊ शकणार नाही. आमदारकीच्या काही वर्षांच्या मुदतीसाठी ते शक्य नाही.”

2024 च्या निवडणुकीत विनोद निकोले दुसऱ्यांदा आमदार

डहाणू विधानसभा मतदारसंघावर अनेक वर्षे काँग्रेसचे वर्चस्व होते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने १९७८, २००९ आणि २०१९ या तीन वेळा येथे विजय प्राप्त केला होता. २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत, विनोद निकोले यांनी भाजपाच्या उमेदवाराचा ४,७०० मतांनी पराभव केला. त्यावेळी काँग्रेस आणि संयुक्त राष्ट्रवादी यांनी विनोद निकोले यांना अप्रत्यक्ष पाठिंबा दिला होता. डहाणू विधानसभा मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विनोद निकोले विजयी झाले आहेत.

यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत डहाणू विधानसभा मतदारसंघात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विनोद निकोले आणि भाजपचे विनोद मेढा यांच्यात तगडी लढत झाली. डहाणू विधानसभा मतदारसंघ हा कम्युनिस्ट पक्षाचा प्रभाव असलेला महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो. सीपीआय(एम) चे विनोद निकोले सध्या डहाणू विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. आता त्यांनी 2024 च्या निवडणुकीत विजयी होऊन दुसऱ्यांदा आमदारपद मिळवले आहे. त्यापूर्वी २००९ मध्ये सीपीआय(एम) च्या तिकीटावर राजाराम ओझारे यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top