माढा लोकसभा निवडणुकीत भाजपने उमेदवारी न दिल्यामुळे धवलसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे कुटुंबीयांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात प्रवेश केला. परंतु, त्यांचे बंधू व भाजपचे विधान परिषद आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपसोबत राहण्याचा निर्णय घेतला. माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे धवलसिंह मोहिते पाटील यांचा विजय झाला, तर भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर पराभूत झाले. तसेच विधानसभा निवडणुकीत भाजप विरोधात प्रचार केल्याचा आरोप माजी आमदार राम सातपुते यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर केला. राम सातपुते यांनी भाजपच्या पक्षश्रेष्ठींना रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्याकडून राजीनामा घेण्याची विनंती देखील केली होती. त्यानुसार, आता भाजपने मोहिते पाटील यांच्याविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
शंकर सहकारी कारखाना कर्ज प्रकरण : मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला राग
महायुती सरकारने ज्या शंकर सहकारी कारखान्यास आर्थिक मदत केली, त्याच कारखान्यातील चिटबॉयकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा प्रचार केला गेला आहे. तसेच, कारखान्याच्या सिव्हिल विभागातील कर्मचाऱ्यांकडून सदाशिवनगर येथील रहिवाशांना घरोघरी जाऊन राष्ट्रवादीच्या उमेदवारास मतदान करण्यास भाग पाडल्याचा आरोप रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर होत आहे. याच दरम्यान, पोलिंग एजंटला कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याची घटना देखील उघडकीस आली आहे. हे सर्व प्रकरण अत्यंत गंभीर असल्याने, मोहिते पाटलांना पुढील सात दिवसांत लेखी स्वरूपात स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ अधिवेशनात माळशिरस तालुक्यातील गुंडगिरीविषयी भाष्य करताना मोहिते-पाटील कुटुंबावर राग व्यक्त केला होता.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरील २३८ कोटी रुपयांच्या वसुलीची कारवाई
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आर्थिक नुकसानीसाठी जबाबदार ठरवलेल्या तत्कालीन ३२ संचालकांसह तीन अन्य अधिकाऱ्यांना २३८ कोटी ४३ लाख रुपयांच्या व्याज आणि दंडासह वसुलीसाठी नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. कर्जाची मुद्दल, व्याज आणि दंड यासह सुमारे ११०३ कोटी रुपयांची वसुली होऊ शकते. या प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार दिलीप सोपल, मोहोळचे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार राजन पाटील, माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे, माजी आमदार संजय शिंदे, एसटी महामंडळाचे दिवंगत माजी अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक यांचे वारसदार, माजी आमदार दीपक साळुंखे यांसारख्या सोलापूर जिल्ह्यातील मात्तबर नेत्यांची नावे समोर आली आहेत.
भाजपकडून रणजीतसिंह मोहिते पाटील यांना कारणे दाखवा नोटीस
रणजीतसिंह मोहिते पाटील यांना भाजप पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या विरोधात काम केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. भाजपचे कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी रणजीतसिंह पाटील यांना नोटीस पाठवली असून, त्यांना सात दिवसांच्या आत स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता रणजीतसिंह मोहिते पाटील हे आता यावर काय निर्णय घेतील व कोणती भूमिका जाहीर करतील याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.