मंत्रिमंडळ विस्तारानंतर महायुतीच्या आमदारांमध्ये नाराजीचा सूर !

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार १५ डिसेंबर २०२४ रोजी नागपूरमध्ये झाला. या विस्तारामध्ये महायुतीच्या अनेक प्रमुख नेत्यांना समाविष्ट करण्यात आले नाही, ज्यामुळे काही नेते नाराज झाले आहेत. बऱ्याच नेत्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे, तर काही आमदारांनी नाराज असतानाही त्याची कबुली दिली नाही. मंत्रिमंडळ जाहीर होण्याआधीच अजित पवार यांनी मंत्रिमंडळातील मंत्रिपदाचा फॉर्मुला सांगितला होता. त्यांनी स्पष्ट केले होते की, जे आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील, ते २.५ वर्ष मंत्री असतील आणि प्रत्येकाचे कामानुसार ऑडिट केले जाईल. तरीही महायुतीतील काही दिग्गज नेत्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. याशिवाय, काही आमदारांनी हिवाळी अधिवेशन सोडून, आपल्या मतदारसंघात परत जाण्याचा निर्णय घेतला.

अजित पवार यांच्याविरोधात भुजबळ समर्थकांचे जोडे मारो आंदोलन

महायुतीच्या नाराज आमदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते माजी मंत्री छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही. याआधी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सरकारमध्ये ते मंत्री होते, तरीदेखील त्यांना या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांची नाराजी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे. मात्र, पत्रकारांशी बोलताना दिलीप वळसे पाटील यांनी ते नाराज नसल्याचे स्पष्ट केले, ज्यामुळे त्यांच्या विषयातील चर्चांना स्थगिती मिळाली. परंतु छगन भुजबळ यांनी आपली नाराजी सार्वजनिकपणे व्यक्त करून ती पत्रकारांशी बोलून दाखवली आहे. एवढेच नाही तर “जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना,” असे सूचक विधान करत त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून पुढील भूमिका जाहीर करण्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन देखील केले. त्यामुळे आता छगन भुजबळ कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्यांकडून छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले जात आहे.

तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे नाराजी

शिवसेना (एकनाथ शिंदे गट) पक्षातील प्रमुख नेत्यांपैकी असलेल्या माजी मंत्री व आमदार तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे ते नाराज झाल्याची चर्चा आहे. तानाजी सावंत यांच्या नाराजीमुळे त्यांनी याबद्दल माध्यमांशी बोलणे टाळले. याबाबत, त्यांच्या कार्यालयाकडून मीडिया साठी एक पत्रक जारी करण्यात आले आहे. त्याचबरोबर, तानाजी सावंत यांनी आपल्या फेसबुक प्रोफाईलचा फोटो बदलल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. विशेषतः, त्यांनी आपल्या प्रोफाईलमधून “शिवसेना” हे नाव काढून “शिवसैनिक” असं लिहिलं आहे. याशिवाय, हिवाळी अधिवेशन सुरू असताना तानाजी सावंत अधिवेशनात उपस्थित नव्हते. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ शपथविधी सोहळ्यालाही ते अनुपस्थित होते.

संजय कुटे म्हणतात, “पक्षावर राग नाही”

जळगाव-जामोद मतदारसंघाचे भाजपाचे आमदार संजय कुटे यांना यावेळी मंत्रिपदाची अपेक्षा होती. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना स्थान मिळालं नाही. कुटे हे जळगाव-जामोद मतदारसंघातून सलग चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. यापूर्वी ते जळंबचे आमदार होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जाणारे संजय कुटे सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. तथापि, त्यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि जळगाव-जामोद येथील भाजप पदाधिकार्‍यांमध्ये नाराजी आहे. या परिस्थितीत त्यांनी कार्यकर्त्यांना शांततेचा संदेश दिला असून, कोणत्याही नेत्यावर टीका न करण्याचे आवाहनत्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून, त्यामध्ये त्यांनी आपल्या भावना स्पष्ट केल्या आहेत. तसेच पक्षावर राग नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

सुधीर मुनगंटीवार म्हणतात, ‘मी मौन राखून, सबुरी ठेवतो

भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांना यंदाच्या नव्या मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आलेले नाही. यंदा भाजपाच्या अनेक मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळले गेले आहे. यामुळे भाजपमध्ये नाराजीनाट्य सुरू असल्याचे दिसून येत आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले, “मी नाराज नाही, पक्षाने जो आदेश दिला आणि जबाबदारी दिली, त्याचे पालन मी केलं आहे. मला माहित आहे की, जर मी विधानसभेत आलो असतो, तर अनेक लोक अनेक प्रश्न विचारले असते. त्या प्रश्नांची उत्तरे देण्यापेक्षा, मौन आणि सर्वार्थ साधन हे मी मानतो. श्रद्धा आणि सबुरी ठेवली पाहिजे. मी संघटनेच्या नव्या आदेशाची वाट पाहत आहे.” दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, सुधीर मुनगंटीवार यांची समजूत काढली जात आहे आणि त्यांना पक्षातील इतर जबाबदाऱ्या सोपवण्यात येणार आहेत.

विजय शिवतारेंची प्रखर नाराजी, ‘जातीयवादाच्या राजकारणामुळे बिहारकडे चाललो आहोत’

शिवसेनेचे माजी मंत्री आणि पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय शिवतारे यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले, “मंत्रिपदाच्या यादीत माझं नाव शेवटपर्यंत होतं, पण अचानक ते कट झाले. त्यामुळे नाराजी आहे, आणि त्यामागची कारणमीमांसा मी पाहिली आहे. “महाराष्ट्रात कर्तृत्व आणि काम महत्त्वाचं असतं, विभागीय प्रतिनिधित्व दिलं पाहिजे. पण आता आपण बिहारकडे जात आहोत. जातीयवादाच्या राजकारणामुळे बिहारचा विकास झाला नाही. आपण सगळे मिळून तिकडेच चाललो आहोत. मंत्रिपद माझ्यासाठी महत्त्वाचं नाही, माझ्या कामाचं महत्त्व आहे. मला लोकांनी निवडून दिलं आहे आणि मला विभागीय नेतृत्व मिळावं. उपयुक्त लोकांच्या हातात सत्ता देऊन महाराष्ट्राला पुढे नेलं पाहिजे. पण आता आपण कुठेतरी बिहारकडे चाललो आहोत. जातीयवादाची सुरूवात धोकादायक आहे. माझं नाव कट झाल्याबद्दल मला दु:ख नाही. लोकांना विश्वासात घेऊन काम करणं महत्त्वाचं आहे. ते न झाल्याने नाराजी शंभर टक्के आहे. अडीच वर्षांनी मंत्रीपद दिलं तरी मी ते स्वीकारणार नाही. माझ्या मतदारसंघातील कामं मुख्यमंत्र्यांकडून करून घेणं, एवढंच आहे. मंत्रिपदाबद्दल मला राग नाही, पण वागणुकीबद्दल प्रचंड राग आहे” अश्या परखड शब्दात त्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली.

सदाभाऊ खोत म्हणतात, ‘शेतकरी जसा पेरणी थांबवत नाही, तसा आम्हीही काम करत राहू’

भाजपचे मित्रपक्षांमध्ये देखील नाराजीचे वातावरण दिसून येत आहे. विधानपरिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी देखील आपली नाराजी व्यक्त केली आहे. नांगरणीसाठी वापरण्यात आलेली बैलगाडी बाजूला ठेवली असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, “२४० लोक निवडून आले आहेत, मंत्रिपद देण्याला काही मर्यादा आहेत. कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतात, कालांतराने ही मंडळी कामात येतील. शेतकरी जर एखाद्या वर्षी शेत पिकलं नाही, तर पेरणी थांबवत नाही. दुसऱ्या वर्षी पेरणी सुरू होईल का, हे पाहत राहायचं.” सदाभाऊ खोत हे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये कृषी राज्यमंत्री होते. त्यांना यावेळी मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा होती, परंतु त्यांना मंत्रिपद मिळाले नाही. काही महिन्यांपूर्वी भाजपने त्यांना विधानपरिषदेवर संधी दिली होती, परंतु यावेळी मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने त्यांनी खंत व्यक्त केली आहे.

रवी राणा यांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराजी

महायुतीमधील युवा स्वाभिमान पक्षाचे बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांना देखील मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे नाराजी व्यक्त झाल्याचं समोर आलं आहे. अमरावती जिल्ह्यातील बड्या नेत्यांचा पराभव करण्यासाठी रवी राणा आणि त्यांच्या पत्नी, माजी खासदार नवनीत राणा यांनी भाजपच्या उमेदवारांना मोठं समर्थन दिलं होतं. त्यामुळे त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती, परंतु मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना स्थान न मिळाल्याने ते नाराज झाले आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराची घोषणा झाल्यानंतर ते अधिवेशन सोडून अमरावतीला परतल्याची माहिती माध्यमांद्वारे समोर आली आहे.

नरेंद्र भोंडेकर म्हणाले, “वेळ पडल्यास आमदारकीचा राजीनामा देईन”

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मंत्रिपद न मिळाल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. “जर वेळ आली, तर मी आमदारकीचा राजीनामा देईन,” अशा प्रखर शब्दात त्यांनी शिवसेनेच्या नेतृत्वावर टीका केली आहे. त्याचसोबत त्यांनी शिवसेनेच्या संघटनात्मक पदाचा देखील राजीनामा दिला आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांचा प्रचार करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः भंडारा जिल्ह्यात गेले होते. पवनी येथील जाहीर सभेत एकनाथ शिंदे यांनी भोंडेकर यांना ‘भावी पालकमंत्री’ असे संबोधले होते. त्यावरून भोंडेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर शब्द न पाळल्याचा आरोप केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top