महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर १५ डिसेंबर २०२४ रोजी नागपूर येथे नवीन मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. याबद्दल आपल्याला माहिती आधीच दिली आहे. जर आपण ती माहिती पाहिली नसेल, तर आपल्याला आमच्या वेबसाइटवर ती पाहता येईल.
राहुल नार्वेकर यांची विधानसभेचे अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली, त्यावेळी अभिनंदन ठरावावर बोलताना जयंत पाटील यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं. विधानसभा अध्यक्ष पदाची महत्त्वता स्पष्ट करताना त्यांनी सांगितलं की, “मी १९९० मध्ये पहिल्यांदा अध्यक्ष झालो.” यावर अजित पवार यांनी तात्काळ उत्तर दिलं, “तुम्ही अध्यक्ष नाही, तर आमदार झालात.” त्यावर जयंत पाटील हसत हसत म्हणाले, “बघा, अजितदादांचं माझ्यावर किती लक्ष आहे.” यावर अजित पवार लगेच उत्तरले, “हो, माझं तुमच्यावर लक्ष आहे, पण तुम्ही कधी प्रतिसाद देता?” त्यावर जयंत पाटील म्हणाले, “दादा, आपल्या पक्षाचा एक नियम आहे – योग्य वेळी योग्य निर्णय.” जयंत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चेला जोर आला आहे.
अजित पवार व फडणवीस यांचे वक्तव्य चर्चेचा विषय
नवीन मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, “एक मंत्रिपद अजूनही रिकामं आहे.” त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यासोबतच, त्यांच्या या वक्तव्याचे आणि जयंत पाटील यांच्या मागील वक्तव्याचे संदर्भ घेत, आता जयंत पाटील अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी चर्चा जोर धरू लागली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विधानपरिषद आमदार अमोल मिटकरी यांनी देखील पत्रकार परिषदेत जयंत पाटील यांच्या प्रवेशाबद्दल एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.
अमोल मिटकरी यांचे सूचक वक्तव्य
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विधानपरिषद नेते अमोल मिटकरी यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले, “जयंत पाटील यांच्या भाषणातील एक महत्त्वाचं वाक्य मला खूप प्रभावित करतं, ‘दादा आपल्या पक्षाचा एक नियम आहे, योग्य वेळी योग्य निर्णय.’ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे अजित पवार, आणि योग्य वेळी योग्य निर्णय ते घेणार आहेत. महाराष्ट्राला याबाबत चांगली बातमी मिळेल असं मला वाटतं. सगळं काही उघडपणे सांगता येत नाही. मागील वेळी त्यांनी प्रयत्न केले होते, पण ती योग्य वेळ नव्हती. त्यांना आवाहन करायला मी मोठा नाही, पण देवगिरीची दारं त्यांच्यासाठी सदैव खुली आहेत. त्यांच्यासारखा नेता महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतो, तो आम्हालाच काय, भाजपाला देखील हवाहवासा वाटतो. ड्रायव्हिंग सीट त्यांच्यासाठी राखीव आहे, कारण ते उत्तम चालक आहेत. जर वेळ आली, तर स्टेरिंग त्यांच्या हाती देऊ. रथ कोणी हाकलावा, हे नंतर ठरेल. हे वक्तव्य महाराष्ट्राला अनेक गोष्टी सांगून जाणारं आहे,” असे सूचक वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केले.
जयंत पाटील खरंच अजित पवार यांच्यासोबत जातील ?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यावर जयंत पाटील यांनी शरद पवार यांच्यासोबत राहणे पसंत केले. पक्षाच्या कठीण काळात त्यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून केलेले योगदान महत्त्वाचे ठरले आहे. तसेच, पवार साहेबांचे विश्वासू आणि निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वी, त्यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून चर्चा सुरू झाली होती. त्यांच्याबद्दल पक्षांतराच्या अनेक बातम्या मीडिया मध्ये आल्यानंतरही, जयंत पाटील यांनी अजूनही शरद पवार यांची साथ सोडलेली नाही. परंतु, या वेळेस अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी एक मंत्रिपद रिक्त ठेवले असल्याचे सांगत, त्यांच्या पक्ष प्रवेशाचे संकेत दिले आहेत. जयंत पाटील यांच्या रोहित पवार यांच्याशी सध्या पक्षांतर्गत मतभेद आणि निधीच्या कमतरतेमुळे पक्ष प्रवेशाच्या चर्चेला मूर्त रूप दिले जात आहे. त्यामुळे, जयंत पाटील खरंच राष्ट्रवादीत प्रवेश करतील का, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
अर्थात
जयंत पाटील हे राजकारणातील एक ज्येष्ठ नेते असून त्यांचा अनुभव अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत, आणि हे मैत्रीपूर्ण संबंध त्यांना नेहमीच राजकीय फायदे साधून देतात. विशेषत: अजित पवार यांच्या बंडाच्या वेळी, असे सांगितले जात होते की अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात मतभेद होते, ज्यामुळे अजित पवार यांनी बंड केले. आता, अजित पवार यांच्याच पक्षात जयंत पाटील जातील का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. आय एल अँड एफ एस कंपनीमधील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ED च्या चौकशीची तलवार त्यांच्या वर आहे. त्यामुळे भाजप किंवा अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्याच्या बातम्या प्रसारित करून आपले राजकीय हित साधून घेण्यात ते यशस्वी होतील कि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा “टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतील” हे आगामी काळामध्ये समजेल.