महाराष्ट्र विधानसभेतील सर्वाधिक वेळा निवडून आलेले आमदार

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदावरून झालेल्या नाराजीनाट्यानंतर, अखेर ५ डिसेंबर २०२४ रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी सोहळा पार पडला. त्यानंतर विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले, ज्यामध्ये नवनियुक्त आमदारांचा शपथविधी हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी घेतला. तसेच ९ डिसेंबर २०२४ रोजी राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. यापूर्वी, आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील धक्कादायक निकाल आणि अत्यंत कमी मताधिक्याने झालेल्या लढतींची माहिती पाहिली. तसेच तुतारी चिन्हामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांना झालेल्या नुकसानीविषयीची माहितीही आपण मागील ब्लॉगमध्ये पाहिली होती. जर तुम्हाला ती माहिती नसेल तर ती वेबसाइटवर उपलब्ध आहे. आज आपण १५ व्या महाराष्ट्र विधानसभेतील सर्वाधिक वेळा निवडून आलेल्या आमदारांची माहिती पाहणार आहोत.

कालिदास कोळंबकर

कालिदास कोळंबकर हे महाराष्ट्र विधानसभेतील सर्वात अनुभवी आणि सर्वाधिक नऊ वेळा निवडून आलेले आमदार म्हणून ओळखले जातात. त्यांचा राजकीय प्रवास शिवसेनेतून सुरू झाला, जिथे ते तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांचे कट्टर समर्थक होते. त्यानंतर, नारायण राणे यांच्या सोबतीने ते काँग्रेसमध्ये गेले आणि नंतर भाजपमध्ये सहभागी झाले. सध्या ते भाजपचे आमदार आहेत आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत हंगामी अध्यक्ष म्हणून त्यांनी आपले कर्तव्य बजावले आहे.

दिलीप वळसे पाटील

दिलीप वळसे पाटील हे १९९० पासून ८ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेल्या दिलीप वळसे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवार यांना साथ दिली. त्यांनी वैद्यकीय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण, ऊर्जा, गृह यांसारखी अनेक कॅबिनेट मंत्रीपदे भूषवली आहेत. त्यांचा राजकीय प्रवास राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांच्यासोबत सुरू झाला होता आणि सध्या ते अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत.

जयंत पाटील

जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे व शरद पवार यांचे विश्वासू समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांनी अनेक वर्षे कॅबिनेट मंत्रीपदे भूषवली आहेत आणि विविध महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी उत्कृष्टपणे पार केली आहे. अर्थमंत्री आणि गृहमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी घेतली आहे. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि विधानसभेत ८ वेळा निवडून आले आहेत. सांगली जिल्ह्यातील एकमेव राष्ट्रवादीचे आमदार म्हणून त्यांची ओळख आहे, तसेच सांगली जिल्ह्यातील एक बलाढ्य नेते म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे.

दिलीप सोपल

दिलीप सोपल हे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी मतदारसंघातून ७ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. प्रारंभिक काळात त्यांनी निवडून येत मोठ्या अपेक्षा दाखवल्या, ज्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळाले. त्यावेळी त्यांचे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चांगले संबंध होते, तसेच मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळामध्ये ते मंत्री होते. नंतर त्यांनी शरद पवार यांना साथ देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१९ मध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यानंतर, शिवसेना फुटल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला आणि सध्या ते शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सदस्य आहेत.

सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार हे भाजपचे एक निष्ठावान आणि विश्वासू आमदार आहेत. ते ७ वेळा विधानसभेत निवडून आले आहेत. मंत्री म्हणून त्यांनी अनेक महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी पार केली आहे. त्यांनी वने, अर्थ, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय या विभागांमध्ये मंत्री म्हणून काम केले. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. याशिवाय, त्यांनी भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणूनही कार्य केले आहे.

छगन भुजबळ

छगन भुजबळ हे ७ वेळा महाराष्ट्र विधानसभेत निवडून आले आहेत. त्यांची राजकीय सुरुवात शिवसेनेमधून झाली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि तेथे त्यांनी अनेक आमदारांसह प्रवेश केला, परंतु त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांना साथ देत मंत्रीपदे भूषवली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर, त्यांनी अजित पवार यांना साथ देत शरद पवार यांना धक्का दिला. छगन भुजबळ हे ओबीसी समाजाचे प्रमुख नेते मानले जातात, तसेच त्यांनी उपमुख्यमंत्री पद, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि गृहमंत्री म्हणूनही कार्य केले आहे.

गिरीश महाजन

गिरीश महाजन हे भाजपचे एक प्रमुख नेते आहेत. ते ७ वेळा विधानसभेत निवडून आले आहेत आणि खान्देशमधील एक प्रमुख राजकारणी म्हणून त्यांची ओळख आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ख्याती आहे. ते भाजपचे संकटमोचक नेते मानले जातात. २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात, गिरीश महाजन यांनी जलसंपदा मंत्री म्हणून जबाबदारी पार केली होती. तसेच, गिरीश महाजन व एकनाथ खडसे यांचे राजकीय वैर देखील सर्वश्रुत आहे.

राधाकृष्ण विखे पाटील

राधाकृष्ण विखे पाटील हे ७ वेळा महाराष्ट्र विधानसभेत निवडून आले आहेत. त्यांना त्यांच्या वडिलांचा राजकीय वारसा मिळाला आहे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे राजकारणी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचा राजकीय प्रवास काँग्रेसमध्ये सुरू झाला होता, पण २०१९ विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये असताना बाळासाहेब थोरात व राधाकृष्ण विखे पाटील यांचे राजकीय वैर प्रसिद्ध होते आणि बाळासाहेब थोरात यांना पराभूत करण्याचे श्रेय राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले जाते. त्यांनी महसूल मंत्री, गृहनिर्माण मंत्री, विरोधी पक्षनेते, कृषी मंत्री, परिवहन मंत्री, शालेय शिक्षण मंत्री आणि अन्य महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

विजयकुमार गावित

विजयकुमार गावित हे नंदुरबार जिल्ह्यातील एक प्रमुख नेते आहेत. ते ७ वेळा विधानसभेत निवडून आले आहेत. त्यांची सुरुवात अप्सखा आमदार म्हणून झाली होती आणि त्यावेळी त्यांनी शिवसेना भाजपच्या सरकारला पाठिंबा देत मंत्रिपद मिळवले होते. नंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि २०१४ मध्ये भाजपमध्ये सामील झाले. त्यांनी आरोग्य व कुटुंब कल्याण, आदिवासी कार्य, वैद्यकीय शिक्षण आणि अन्न उत्पादन हे विभाग मंत्री म्हणून कार्य केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top