माळशिरस च्या मारकडवाडी मध्ये नेमकं चाललंय काय …???

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीने दणदणीत विजय मिळवला. परंतु त्यानंतर महाविकास आघाडी कडून निवडणूक प्रक्रियेवर आणि EVM वर अनेक आरोप करण्यात आले. अनेक उमेदवारांनी मतमोजणीच्या वेळी फेरमतमोजणीसाठी अर्ज केले, तसेच EVM विरोधात देखील त्यांनी तक्रारी दाखल केल्या. काही उमेदवारांनी फेरमतमोजणीसाठी पैसे भरून अर्ज केले आहेत. या सर्व आरोपांसोबतच, अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल देखील समोर आले आहेत. अनेक मोठ्या नेत्यांचा पराभव झाला, जे अनेक मतदारसंघांमध्ये आश्चर्यकारक ठरले. याची माहिती तुम्ही आमच्या मागील ब्लॉगमध्ये पाहिलीच असेल. आता, याच संदर्भात सोलापूरमधील माळशिरस मतदारसंघातील घडामोडीवर एक नजर टाकू या.

माळशिरस मधील मारकडवाडी मधील अनपेक्षित निकाल आणि EVM वाद :

माळशिरस विधानसभा निवडणुकीत भाजपचे माजी आमदार राम सातपुते आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उत्तमराव जानकर यांच्यात चुरशीची लढत झाली. या लढतीत उत्तमराव जाणकार यांनी विजय प्राप्त केला. हा मतदारसंघ SC राखीव आहे आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा प्रभाव येथे मोठा आहे.
माळशिरस विधानसभा मतदारसंघात मागील १५-२० वर्षांपासून मोहिते पाटील व उत्तमराव जानकर यांच्यात तीव्र राजकीय स्पर्धा चालू होती. लोकसभा निवडणुकीवेळी उत्तमराव जाणकार यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा दिला आणि शरद पवार गटात प्रवेश केला. यामुळे लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांना माळशिरस मधून ७०,००० मतांचे मताधिक्य मिळाले होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत या मतांचा फरक आणखी जास्त होईल, असा अनुमान लोकांमध्ये होता. मात्र, उत्तमराव जानकर यांना फक्त १३,१४७ मतांच्या फरकाने विजय मिळाला. यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला आणि त्यांनी EVM चा दोष देण्यास सुरुवात केली.

मारकडवाडीतील EVM वाद: गावकऱ्यांची स्वयंस्फूर्त कार्यवाही

माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावात निवडणुकीनंतर एक वेगळीच तयारी कार्यकर्त्यांनी आणि गावकऱ्यांनी सुरू केली. निकालानंतर गावातील सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन EVM वर आरोप करण्यास सुरुवात केली. या गावात प्रत्येक निवडणुकीत उत्तमराव जानकर यांना नेहमीच मताधिक्य मिळत होते, आणि बाकीचे मतदान मोहिते पाटील कुटुंबाच्या उमेदवाराला जात होते. परंतु, यावेळी दोन्ही गट एकत्र असूनही, भाजप उमेदवार राम सातपुते यांना गावामधून १६० मतांची आघाडी मिळाल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.
या अनपेक्षित निकालामुळे गावातील सर्व मतदार एकत्र आले आणि निवडणूक आयोगाकडे बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी विनंती केली. मात्र निवडणूक आयोगाने त्याची मान्यता दिली नाही. परिणामी, गावकऱ्यांनी स्वखर्चाने सर्व व्यवस्था केली आणि गावातील मतदारांना मतदानासाठी आवाहन केले. ग्रामपंचायत कार्यालयासमोर मंडप उभा करून मतदानाची तयारी केली गेली. ३ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते ४ या वेळेत गुप्त मतदान पद्धतीने बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचे सर्व मतदारांना आवाहन करण्यात आले.

EVM वादावर गावकऱ्यांचा ठाम निर्धार, पोलिसांचे हस्तक्षेप :

या सर्व घडामोडींमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने ५ डिसेंबरपर्यंत जमावबंदी लागू केली होती. तथापि, गावकऱ्यांनी मतदानाच्या निर्णयावर ठाम राहण्याचे ठरवले. त्यांनी खुलेपणाने म्हटले, “आम्ही अंगावर गोळ्या झेलायला तयार आहोत, परंतु मतदान होईलच!” ही प्रतिक्रिया गावकऱ्यांची होती. यामध्ये उत्तमराव जानकर यांनी पत्रकार परिषद घेऊन EVM वर आरोपही केले होते.

३ डिसेंबर रोजी गावकऱ्यांनी मतदानाची तयारी सुरू केली, आणि मतदान प्रक्रिया सुरू होणारच अशी त्यांची ठाम भूमिका होती. यावेळी पोलिसांनी येऊन सर्वांना मतदान प्रक्रिया थांबवण्याच्या सूचना दिल्या. परंतु गावकऱ्यांची ठाम भूमिका पाहून पोलिसांच्या हस्तक्षेपाला विरोध झाला. यामध्ये उत्तमराव जाणकर यांनी मध्यस्थी केली आणि पोलिसांनी गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, हे लक्षात घेतल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांचा निर्णय मागे घेतला. उत्तमराव जाणकर यांचे हस्तक्षेपामुळे गावकऱ्यांचा संघर्ष टळला.

राम सातपुते यांचा आरोप: रणजितसिंह मोहिते पाटील आणि उत्तमराव जानकर यांच्या पार्श्वभूमीवर टीका

राम सातपुते यांनी उत्तमराव जानकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी म्हटले, “उत्तमराव जानकर हे फक्त प्यादे आहेत, आणि यामागे मास्टरमाईंड म्हणून रणजितसिंह रणजितसिंह मोहिते पाटील आहेत.” त्याच वेळी, राम सातपुते यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर भाजपच्या विधानपरिषद आमदार असताना, त्यांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराचा प्रचार केल्याचा आरोप केला. यावर, राम सातपुते यांनी भाजप कडे रणजितसिंह मोहिते पाटील यांना निलंबित करण्याची मागणी केली असल्याचेही दिसून आले.

अर्थात :

मारकडवाडी गावात, जरी उत्तमराव जाणकार यांना पूर्वी मताधिक्य मिळत असेल, तरी याचा अर्थ असा असू शकतो की या गावात मोहिते पाटील कुटुंबाच्या विरोधात मतदान करणारे मतदार होते. उत्तमराव जानकर हे मोहिते पाटील यांच्या गटात सामील झाल्याने, येथील मतदारांसमोर राम सातपुते यांचा एक पर्याय उपलब्ध झाला, आणि त्यामुळे या वेळी त्यांना मतदान होण्याची शक्यता निर्माण झाली, असे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.

मोहिते पाटील यांना मानणारा मतदार असला तरी, राम सातपुते यांचा वेगळा प्रभावही आहे. यापूर्वी ते आमदार होते आणि त्यांनी मोहिते पाटील कुटुंबाच्या बाहेर एक स्वतःचे वलय निर्माण केले आहे. त्यामुळे येत्या काळात अशा काही चकित करणाऱ्या घडामोडी घडू शकतात, असे संकेत दिसून येत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top