मनसे: एक पार्टी, अनेक आव्हाने

शिवसेनेतून राज ठाकरे यांनी २७ नोव्हेंबर २००५ रोजी “माझा वाद माझ्या विठ्ठलाशी नाही, तर त्याच्या बाजूच्या बडव्यांशी आहे” असे म्हणत शिवसेनेला अलविदा केले. त्यानंतर ९ मार्च २००६ रोजी त्यांनी “महाराष्ट्र नवनिर्माण सेना” या नावाने आपला स्वतंत्र पक्ष स्थापन केला. या वेळी राज ठाकरे यांच्यासोबत महाराष्ट्रातील अनेक शिवसैनिक आणि त्यांच्या निष्ठावंत समर्थकांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक वेळा टीका केली. राज ठाकरे यांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली होती.

मनसेचे पहिल्या प्रयत्नातील यश

राज ठाकरे यांनी नवीन पक्ष स्थापन केल्यानंतर मराठी भाषेचा आणि मराठी माणसाचा मुद्दा समोर करत, परराज्यातून येणाऱ्या लोंढ्यांना थांबवण्याचे आवाहन सत्ताधाऱ्यांना दिले होते. याच मुद्द्यावर आधारित त्यांचा पक्ष २००९ च्या विधानसभा निवडणुकीत सहभागी झाला. पहिल्याच निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने १४३ विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे केले. त्यातील १३ उमेदवार विजयी झाले, १२ उमेदवार दुसऱ्या स्थानी आले आणि ५३ उमेदवार तिसऱ्या स्थानी होते. पहिल्याच प्रयत्नात १३ आमदार निवडून आणणे हे सहजासहजी शक्य नसल्याने, संपूर्ण महाराष्ट्रात मनसेची चर्चा रंगली होती.

२०१४ मध्ये मनसेला मिळालेले सीमित यश आणि राज ठाकरे यांचे मोदी समर्थन

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत त्यांना पाठिंबा दिला होता. परंतु, विधानसभा निवडणुकीत मनसेला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. २१९ उमेदवारांपैकी फक्त १ उमेदवार विजयी झाला, ६ उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते, तर १५ उमेदवार तिसऱ्या स्थानी होते. २००९ मध्ये निवडून आलेले काही आमदार पराभूत झाले, आणि काही आमदारांनी इतर पक्षांत प्रवेश करून दुसऱ्या पक्षातून निवडणूक लढवली. २०१४ मध्ये मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे हे जुन्नर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले.

२०१९ लोकसभेमध्ये मोदींना विरोध आणि विधानसभेत अपेक्षाभंग

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांचा प्रचंड विरोध करत “लाव रे तो विडिओ” या घोषणेमुळे मोदींच्या विरोधात सभा घेतल्या. त्यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कल्याण ग्रामीण मतदारसंघातील उमेदवार राजू पाटील यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पाठिंबा मिळाल्यामुळे त्यांचा विजय सुखकारक झाला असे मानले जाते. २०१४ विधानसभा निवडणुकीत मनसेने १०१ जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यातील एक उमेदवार विजयी झाला, १० उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते, तर २५ उमेदवार तिसऱ्या स्थानी होते.

हिंदुत्ववादी भूमिका व नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा तरीही अपेक्षाभंग

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा दिला आणि त्यांच्या समर्थनार्थ संपूर्ण महाराष्ट्रात सभा घेतल्या. तसेच, हिंदुत्वाचा मुद्दा पुढे ठेवत, ३७७ कलमाच्या समर्थनार्थ मोर्चे देखील काढले. या पार्श्वभूमीवर, महायुतीत सामील होण्याच्या चर्चांमध्ये राज ठाकरे यांना काही जागा महायुती कडून दिल्या जाऊ शकतात, असे सांगितले जात होते. परंतु महायुतीच्या जागावाटपापूर्वी राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाची उमेदवार यादी जाहीर केली. त्यात त्यांच्या पुत्र अमित ठाकरे यांचे नाव उमेदवार म्हणून जाहीर केले गेले.
तथापि, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत १२५ पैकी एकही उमेदवार निवडून आले नाही. फक्त २ उमेदवार दुसऱ्या स्थानी होते, आणि त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यासह ३९ उमेदवार तिसऱ्या स्थानी होते. यामुळे मनसेला मोठा पराभव सहन करावा लागला.

अर्थात

वेळोवेळी पक्षाच्या भूमिका बदलल्यामुळे काही प्रमाणात मतदारवर्ग नाराज असल्याचे दिसून येत आहे. पक्षाचा होणारा पराभव हा पक्षासाठी एक गंभीर इशारा ठरलेला आहे. २०२४ च्या निवडणुकीत झालेला दारुण पराभव आणि त्याच्या परिणामी पक्षाची मान्यता रद्द होण्याच्या चर्चा माध्यमांमध्ये सुरू आहेत. पक्षातील अंतर्गत वाद, उमेदवारांचा मतदारांशी कमी असलेला जनसंपर्क, तसेच महाराष्ट्रभर पक्षाची प्रभावी बांधणी यामध्ये कमतरता असल्यामुळे, मनसेसाठी २००९ मध्ये मिळालेल्या यशाची पुनरावृत्ती करणे कठीण झाले आहे. आगामी काळात, मनसे “एकलाचलो रे” ची भूमिका घेऊन पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करेल का, किंवा इतर कोणत्या पक्षासोबत युती करून पक्षाची वाढ साधली जाईल, हेच येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top