चिन्हांचे गोंधळ: पिपाणी आणि तुतारीचे महाराष्ट्रातील निवडणुकीवरील प्रभाव
महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळे अनेक बदल घडले. अजित पवार गटाला “घड्याळ” हे चिन्ह मिळाले, तर शरद पवार गटाला “तुतारी फुंकणारा माणूस” हे चिन्ह मिळाले. यानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत तुतारी आणि पिपाणी या चिन्हांमधील गोंधळामुळे मतदारांमध्ये गफलत झाली, ज्यामुळे पिपाणी चिन्हावर मतदान गेले आणि अनेक उमेदवार पराभूत झाले. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतही अनेक मतदारसंघांमध्ये पिपाणी चिन्हावर मतदान गेले, ज्यामुळे उमेदवारांचा पराभव झाला. याचीच काही उदाहरणे पाहूयात.
शहापूर
शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दौलत दरोडा विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पांडुरंग बरोरा अशी लढत होती. या लढतीमध्ये अजित पवार गटाचे दौलत दरोडा हे १६७२ मतांनी विजयी झाले. परंतु येथील अपक्ष उमेदवार रमा शेंडे ज्यांचे निवडणूक चिन्ह पिपाणी होती यांना ३८९२ मते मिळाली. त्यामुळे या मतदारसंघाध्ये शरद पवार गटाला फटका बसला.
बेलापूर
बेलापूर विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप कडून मंदा म्हात्रे विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून संदीप गणेश नाईक अशी लढत होती. या लढतीमध्ये भाजपच्या मंदा म्हात्रे या ३७७ मतांनी विजयी झाल्या. परंतु येथील अपक्ष उमेदवार प्रफुल्ल म्हात्रे ज्यांचे निवडणूक चिन्ह पिपाणी होते यांना १८६० मते मिळाली. या मतदारसंघामध्ये भाजपचे गणेश नाईक यांचा प्रभाव तरीही येथून गणेश नाईक यांना पिपाणी चिन्हाचा फटका बसल्याचे येथील मतदारांमध्ये चर्चा दिसून येते.
अणुशक्ती नगर
या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे माजी मंत्री नवाब मलिक यांना मानणारा एक गट आहे. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून फहाद अहमद हे रिंगणात होते. या लढतीमध्ये सना मलिक यांनी फहाद अहमद यांचा ३३७८ मतांनी पराभव केला. तसेच येथील अपक्ष उमेदवार जयप्रकाश अगरवाल ज्यांचे निवडणूक चिन्ह पिपाणी होते त्यांना ४०७५ मते मिळाली. त्यामुळे येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवाराचा पराभव झाला.
जिंतूर
जिंतूर मतदारसंघात भाजपच्या मेघना बोर्डीकर आणि शरद पवार गटाच्या विजय भांबळे यांच्यात चुरशीची लढत रंगली होती. या संघर्षात भाजपच्या मेघना बोर्डीकर यांनी शरद पवार गटाच्या विजय भांबळे यांना ४५१६ मतांनी पराभूत करत विजय मिळवला. याशिवाय, अपक्ष उमेदवार विनोद भावळे, ज्यांचे निवडणूक चिन्ह पिपाणी होते, त्यांना ७४३० मते मिळाली. ह्यामुळे शरद पवार गटाच्या विजय भांबळे यांना मोठा फटका बसला आणि त्यांच्या विजयाच्या मार्गावर अडथळा निर्माण झाला.
घनसावंगी
या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे हिकमत उधाण आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजेश टोपे यांच्यात थेट संघर्ष होता. हिकमत उधाण यांनी राजेश टोपे यांना २३०९ मतांनी पराभूत करत आपला विजय पक्का केला. त्याचबरोबर, अपक्ष उमेदवार बाबासाहेब शेळके, ज्यांचे निवडणूक चिन्ह पिपाणी होते, त्यांना ४८३० मते मिळाली. या मतदारसंघात माजी मंत्री राजेश टोपे यांचे प्रभावी वर्चस्व कायम होते, आणि त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने होते. त्यामुळे राजेश टोपे यांचा पराभव पिपाणी चिन्हामुळे झाला, अशी चर्चा येथील लोकांमध्ये रंगली आहे.
आंबेगाव
या विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माजी मंत्री दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार गटाचे देवदत्त निकम यांच्यात चुरशीची लढत होती. या लढतीत शरद पवार यांनी स्वतः देवदत्त निकम यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना पाठिंबा दिला होता. तरीही, देवदत्त निकम यांना १५२३ मतांनी पराभव सहन करावा लागला. या निवडणुकीत एक इंटरेस्टिंग वळण देखील घेतले, कारण अपक्ष उमेदवार देवदत्त शिवाजी निकम, ज्यांचे निवडणूक चिन्ह पिपाणी होते आणि नावामध्ये साधर्म्य होते, त्यांना २९६५ मते मिळाली. यामुळे, पिपाणी चिन्हाचा फटका देवदत्त निकम यांना बसला. निवडणुकीच्या निकालानंतर वळसे पाटील यांनी मीडियाशी बोलताना कबूल केले कि, “मला पिपाणी चिन्हामुळे विजय मिळवण्यात मदत झाली.”
परांडा
या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री तानाजी सावंत आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राहुल मोठे यांच्यात चुरशीची लढत रंगली होती. या निवडणुकीत तानाजी सावंत यांनी राहुल मोठे यांना १५०९ मतांनी पराभूत करत विजय मिळवला. यामध्ये अपक्ष उमेदवार जमील खान यांनी ४४४६ मते मिळवली. राहुल मोठे यांना या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळालेला होता, आणि माजी आमदार स्व. ज्ञानेश्वर पाटील यांचे पुत्र रणजीत पाटील यांनी देखील राहुल मोठे यांना समर्थन दिल्याने, तानाजी सावंत यांच्यासाठी लढाई थोडी कठीण होती. मात्र, पिपाणी चिन्हामुळे त्यांना विजय मिळवण्यात मदत झाली, अशी चर्चा येथील मतदारांमध्ये केली जात आहे.
पारनेर
पारनेर मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांची निवडणूक लढत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे काशिनाथ दाते यांच्याशी होती. या तणावपूर्ण लढतीत राणी लंके यांना १५२६ मतांनी पराभवाचा सामना करावा लागला. याशिवाय, अपक्ष उमेदवार सखाराम सरक, ज्यांचे निवडणूक चिन्ह पिपाणी होते, त्यांना ३५८२ मते मिळाली. या मतदारसंघात निलेश लंके यांचे समर्थक मोठ्या संख्येने होते, तरीही त्यांच्या पत्नीचा पराभव पिपाणी चिन्हामुळे झाला, अशी चर्चा येथील पत्रकारांमध्ये ऐकायला मिळते.
केज
केज मतदारसंघात भाजपच्या नमिता मुंदडा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पृथ्वीराज साठे यांच्यात थेट लढत होती. या चुरशीच्या लढतीत नमिता मुंदडा यांनी पृथ्वीराज साठे यांना २६८७ मतांनी पराभूत केले. याशिवाय, येथील अपक्ष उमेदवार अशोक थोरात, ज्यांचे निवडणूक चिन्ह पिपाणी होते, त्यांना ३५५९ मते मिळाली. यामुळे पिपाणी चिन्हाचा लाभ भाजपच्या उमेदवार नमिता मुंदडा यांना झाला, ज्यामुळे त्यांचा विजय सुलभ झाला.