एक्झिट पोल्स फसले, धक्कादायक निकाल ! “महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: धक्कादायक निकाल आणि त्यांचे विश्लेषण”

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आणि काही अत्यंत धक्कादायक निकाल समोर आले. मतदान झाल्यानंतर अनेक एक्झिट पोल कंपन्यांनी त्यांचे अंदाज जाहीर केले होते. परंतु आज सकाळी निकालांची घोषणा होताच हे सर्व एक्झिट पोल पूर्णपणे अपयशी ठरल्याचे स्पष्ट झाले. महायुतीने अपेक्षेपेक्षा अधिक जागा जिंकल्या, ज्यामुळे एक अनपेक्षित आणि चकित करणारा निकाल दिसून आला. महाविकास आघाडीला विरोधी पक्ष म्हणून मान्यता मिळेल का, या मुद्द्यावर सध्या अनेक शंका व्यक्त केल्या जात आहेत. याव्यतिरिक्त, काही विधानसभा मतदारसंघांमध्ये अत्यंत धक्कादायक निकाल लागले आहेत. महाराष्ट्रातील अनेक दिग्गज राजकीय नेत्यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. विशेषतः काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांचा पराभव पाहून अनेक जण आश्चर्यचकित आहेत. यामध्ये काय घडलं आणि या निवडणुकीचे परिणाम कसे महत्त्वाचे आहेत, याचे विश्लेषण करतांना काही महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष देऊया.

संगमनेर विधानसभा

संगमनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे माजी मंत्री आणि आमदार बाळासाहेब थोरात १९८५ पासून प्रतिनिधित्व करत होते. मात्र, या निवडणुकीत त्यांच्याविरोधात भाजप कडून माजी खासदार सुजय विखे पाटील निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. त्याच वेळी, शिवसेनेने भाजपच्या अमोल खताळ यांना शिवसेनेमध्ये प्रवेश देत उमेदवारी दिली. यावेळी सुजय विखे पाटील यांनी आपले समर्थन अमोल खताळ यांना दिले आणि त्यांचा मार्ग मोकळा केला. अमोल खताळ यांनी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांचा १०,५६० मतांच्या फरकाने पराभव करून आपले नाव इतिहासात कोरले. खास गोष्ट म्हणजे अमोल खताळ यांच्या करिअरमधील ही पहिलीच विधानसभा निवडणूक होती, आणि त्यात त्यांनी माजी मंत्री असलेल्या थोरात यांना हरवले. यामुळे काँग्रेस आणि बाळासाहेब थोरात यांच्यासाठी हा एक मोठा धक्का ठरला आहे. अमोल खताळ यांच्या या विजयामुळे त्यांना “जायंट किलर” म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.

कराड दक्षिण

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात यावेळी धक्कादायक निकाल समोर आला. या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण करत होते. परंतु, या निवडणुकीत भाजपचे अतुल भोसले आणि काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांच्यात मुकाबला झाला. या थरारक लढतीत भाजपचे उमेदवार अतुल भोसले यांनी काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांना ३९,३५५ मतांनी पराभूत करून “जायंट किलर” म्हणून ओळख मिळवली. हा विजय पृथ्वीराज चव्हाण यांच्या बाबतीत एक मोठा धक्का सिद्ध झाला.

भोर – वेल्हा – मुळशी विधानसभा

या मतदारसंघामध्ये १९९९ चा अपवाद वगळता १९७२ पासून या विधानसभामध्ये थोपटे परिवाराचे निर्विवाद वर्चस्व असल्याचे दिसून येते. त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेस व थोपटे परिवाराचा बालेकिल्ला मानला जातो. २०२४ विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस चे आमदार संग्राम थोपटे विरुद्ध राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर यांची लढत झाली. या लढतीमध्ये शंकर मांडेकर यांनी संग्राम थोपटे यांचा १९,६३८ मतांनी पराभव केला.

कोल्हापूर जिल्हा

कोल्हापूर जिल्ह्यात १० विधानसभा मतदारसंघांमध्ये महाडिक कुटुंबाचे वर्चस्व होते, ज्याला सतेज (बंटी) पाटील यांनी काँग्रेसच्या माध्यमातून महाडिक परिवाराचे साम्राज्य खालसा केले होते. पण, या विधानसभा निवडणुकीत त्यांचे पुतणे ऋतुराज पाटील आणि महाविकास आघाडीचे इतर उमेदवार पराभूत झाले. यामुळे सतेज पाटील यांना हा एक मोठा धक्का ठरला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सतेज पाटील यांचे एकहाती वर्चस्व होते, म्हणूनच या पराभवाला “त्यांच्या बालेकिल्ल्याला लागलेला सुरुंग” असे अनेकजण मानत आहेत. यामुळे महाराष्ट्रात व कोल्हापूर जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे.

वसई विधानसभा

वसई विधानसभा मतदारसंघात १९९० पासून बविआचे हितेंद्र ठाकूर निवडून येत होते. या विधानसभा निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांच्याविरोधात भाजपच्या स्नेहा दुबे-पंडित यांची लढत होती. या जोरदार स्पर्धेत स्नेहा दुबे-पंडित यांनी ३,१५३ मतांनी हितेंद्र ठाकूर यांचा पराभव केला. त्यामुळे, हितेंद्र ठाकूर यांना हा पराभव एक मोठा धक्का ठरला आहे.

तिवसा विधानसभा

तिवसा विधानसभा मतदारसंघात २००९ पासून यशोमती ठाकूर आमदार म्हणून निवडून येत होत्या. ठाकरे सरकारच्या काळात त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणूनही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. या निवडणुकीत भाजपचे राजेंद्र वानखेडे आणि काँग्रेसच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्यात मुकाबला झाला. या लढतीत भाजपचे राजेंद्र वानखेडे यांनी काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांचा ७,६१७ मतांच्या फरकाने पराभव करून एक मोठा विजय मिळवला.

अचलपूर विधानसभा

अचलपूर विधानसभा मतदारसंघात २००४ पासून माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू हे आमदार म्हणून निवडून येत होते. परंतु २०२४ च्या निवडणुकीत भाजपचे प्रवीण तायडे, प्रहार पक्षाचे माजी मंत्री बच्चू कडू आणि काँग्रेसचे बबलू देशमुख यांच्यात तिरंगी लढत रंगली. या तुफान स्पर्धेत भाजपचे प्रवीण तायडे यांनी १२,१३१ मतांनी बच्चू कडू यांचा अनपेक्षित पराभव करून सर्वांना आश्चर्यचकित केले. त्यामुळे प्रवीण तायडे हे “जायंट किलर” ठरले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top