सर्वपक्षीय पाठिंब्यामुळे फायदा होणार कि २०१९ ची पुनरावृत्ती होणार..?? “या निवडणुकीमध्ये महायुती कडून किंवा महाविकास आघाडीकडून प्रचारासाठी कोणताही मोठा नेता आला नसल्याचे दिसून आले”

मावळ विधानसभा मतदारसंघात १९९५ पासून भाजपचा उमेदवार निवडून येत आहे. या कालावधीत १९९५ मध्ये रुपलेखा ढोरे निवडून आल्या, १९९९ आणि २००४ मध्ये दिगंबर भेगडे यांचा विजय झाला, तर २००९ आणि २०१४ मध्ये संजय (बाळा) भेगडे निवडून आले. परंतु, २०१९ मध्ये तत्कालीन भाजपचे नगरसेवक सुनील (अण्णा) शेळके हे भाजपकडून उमेदवारी मिळवू शकले नाहीत. त्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून उमेदवार बनले आणि त्या निवडणुकीत विजय मिळवला. त्याच वेळी, संजय (बाळा) भेगडे यांचा पराभव झाला. २०१९ मध्ये भाजपच्या भक्कम स्थितीत असलेल्या मावळमध्ये सुनील शेळके यांच्या विजयामुळे एक महत्त्वाचा बदल घडला. हा बदल विशेषतः त्यामुळे चर्चिला गेला की, मावळ विधानसभा मतदारसंघात आजपर्यंत कोणत्याही उमेदवाराची हॅट्रिक नाही झाली. त्यामुळे, २०१९ च्या निवडणुकीत बाळा भेगडे यांचा पराभव झाल्यानंतर लोकांमध्ये हा मुद्दा चर्चेचा विषय बनला होता.

विकासकामांसाठी सत्तेचा निर्णय.?

२०१९ मध्ये आमदारपद मिळवल्यानंतर सुनील शेळके यांनी मावळ मतदारसंघात शरद पवार यांना अनेक वेळा बोलावून त्यांचा विश्वास जिंकला. पवार साहेब त्यांच्या पाठीशी होते आणि त्यांना पूर्ण पाठिंबा देत होते, असे येथील पत्रकारांची मते आहेत. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, सुनील शेळके यांनी आपल्या मतदारसंघातील लोकांचा विश्वास जिंकला. तथापि, २०२३ साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात झालेल्या फुटीनंतर सुनील शेळके यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाबाबत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, “सत्तेमध्ये असतानाच मला माझ्या मतदारसंघातील विकासकामांसाठी आवश्यक निधी प्राप्त होऊ शकतो.” त्यामुळेच त्यांनी अजित पवार यांच्यासोबत जाणे पसंतीचे ठरवले. सुनील शेळके यांनी याव्यतिरिक्त ४,००० कोटी रुपयांच्या निधीच्या सहाय्याने मतदारसंघात अनेक विकासकामे केली असल्याचे सांगितले. त्यांना विश्वास आहे की, या कामामुळे मतदारसंघातील लोकांचा त्यांना पूर्ण पाठिंबा मिळालेला आहे. या मुद्द्यांवर ते म्हणाले, “माझ्या मतदारसंघातील विकासासाठी जो निधी मिळाला, तो अजित पवार यांच्या मदतीनेच शक्य झाला.” २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सुनील शेळके यांच्या विजयामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे बापू भेगडे यांनी या निवडणुकीमध्ये त्यांच्याच विरोधात बंडखोरी केल्याने सुनील शेळके यांच्यासाठी एक मोठा राजकीय धक्का सिद्ध झाला.

बापू भेगडे विरुद्ध सुनील शेळके: मावळ विधानसभा निवडणुकीतील राजकीय चुरस

२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत सुनील शेळके आणि संजय भेगडे यांच्यात थेट लढत होईल, अशी सर्वांनाच अपेक्षा होती. परंतु, मावळमध्ये राजकारण एका वेगळ्या वळणावर गेलं आणि अचानक बापू भेगडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीकडून सुनील शेळके यांना उमेदवारी मिळाल्यानंतर भाजपचे माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राजीनामा दिला आणि बापू भेगडे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. याच दरम्यान, संजय (बाळा) भेगडे यांनी “किंगमेकर” च्या भूमिकेत राहणे पसंतीचे ठरवले आहे, आणि ते स्वतः बापू भेगडे यांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले आहेत. राज ठाकरे, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस या सर्व पक्षांकडून बापू भेगडे यांना पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले व ते यशश्वी झाले. बापू भेगडे यांना “सर्वपक्षीय उमेदवार” अशी उपमा देत त्यांची तयारी सुरू आहे. तसेच स्व. किशोर आवारे यांच्या गटाने देखील बापू भेगडे यांना समर्थन दिले आहे. आता, बापू भेगडे यांना सर्वपक्षीय पाठिंब्याचा फायदा होईल का, की सुनील शेळके यांना लोकांची पसंती मिळेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

अर्थात –

२०२४ च्या मावळ विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अपक्ष उमेदवार यांच्यात थेट लढत पाहायला मिळत आहे. यामुळे या निवडणुकीची रंगत अधिक वाढलेली आहे आणि ती एक महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली आहे. मावळ विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासावर नजर टाकल्यास, या भागात लोणावळा, वडगाव आणि तळेगाव या शहरी भागांमधून जास्त मतदान होईल, तो उमेदवार निवडून येतो हे स्पष्ट झाले आहे. लोकसभा निवडणुकीत देखील या शहरी भागांमधून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना प्रचंड मताधिक्य मिळाले होते, तर महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांना ग्रामीण भागामधून अधिक मतं मिळाली होती. त्यामुळे, यावेळी दोन्ही उमेदवार शहरी भागात आपली ताकद दाखवण्यासाठी काम करत असल्याचे दिसून येते. शहरी भागातील लोकांची पसंती कोणाला मिळते हे पाहणे खूप महत्त्वाचे ठरेल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top