वडिलांच्या पराभवाचा वचपा काढणार कि २०१४ ची पुनरावृत्ती होणार ??? “कोकणच्या राजकारणात एक नवा अध्याय: निलेश राणे आणि वैभव नाईक यांची निवडणुकीतील स्पर्धा”

कोकणाच्या राजकारणावर चर्चा करत असताना, राणे या नावाशिवाय चर्चा पूर्ण होणं अशक्य आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा नारायण राणे यांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यांच्याबद्दल बोलण्याआधी कोकणाच्या राजकीय इतिहासावर नजर टाकू या. नारायण राणे यांच्या आधी बॅरिस्टर नाथ पै आणि मधु दंडवते यांचं कोकणातील नेतृत्व होतं. या दोन्ही नेत्यांच्या राजकारणाला उच्चशिक्षित आणि सुसंस्कृत असा ठसा होता. आज कोकण रेल्वेमुळे लाखो लोकांचा प्रवास सोप्पा झाला आहे आणि रोजगारनिर्मिती देखील झाली आहे, हे सर्व मधु दंडवते यांचं मोठं योगदान मानलं जातं. त्यांच्यामुळेच कोकण रेल्वेचं स्वप्न साकार होऊ शकलं. नारायण राणे यांनी नेहमीच या दोन्ही नेत्यांचं कौतुक केलं आहे. 90 च्या दशकापूर्वी, कोकणावर काँग्रेस आणि समाजवादी विचारसरणीचा प्रभाव होता, परंतु त्या दशकाच्या मध्यंतरापासून शिवसेनेची ताकद कोकणात वाढू लागली.

वैभव नाईक आणि निलेश राणे यांच्यातील ही झुंज कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीत निर्णायक ठरू शकते. वैभव नाईक यांनी स्थानिक पातळीवर आपल्या कार्यकर्त्यांचा मोठा आधार तयार केला आहे आणि उद्धव ठाकरे यांचे निष्ठावान समर्थक म्हणून त्यांचा एक मजबूत जनसंपर्क देखील आहे. दुसरीकडे, निलेश राणे यांच्या मागे त्यांच्या कुटुंबाचा प्रचंड प्रभाव आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे समर्थन आहे. ते धनुष्यबाण चिन्हावर लढताना, आपल्या वडिलांच्या राजकीय वारसाचा फायदा घेऊन निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. यामुळे, दोन्ही पक्षांमध्ये चुरस वाढलेली आहे आणि हा लढा अत्यंत रोचक ठरणार आहे. वैभव नाईक यांच्या पक्षीय निष्ठेबाबत आणि निलेश राणे यांच्या वडिलांच्या राजकीय वारशाबद्दल असलेला विश्वास यामुळे, कुडाळ-मालवण मतदारसंघात ही निवडणूक एक मोठा कलाटणी ठरू शकते.

निलेश राणे: बदललेल्या नेतृत्वाची नवी ओळख

निलेश राणे यांनी कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात मजबूत संघटनात्मक बांधणी केली आहे. “१० वर्षांपूर्वीचे निलेश राणे आणि आजचे निलेश राणे यामध्ये खूप फरक आहे. आज निलेश राणे स्वतः मतदारांपर्यंत आणि कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचले आहेत. ते त्यांच्या समस्या समजून घेत आहेत आणि शक्यतो त्या सोडवत आहेत. याचा लोकसभा निवडणुकीतील निकाल देखील प्रत्ययकारक होता. लोकसभा निवडणुकीत कुडाळ मतदारसंघातून नारायण राणे यांना २६ हजार मताधिक्क्य मिळालं,” असे येथील जाणकारांच्या बोलण्यातून दिसुन येते. निलेश राणे म्हणाले ,रवींद्र चव्हाण यांनी मला यापूर्वी विचारलं होतं की, ‘तुम्ही राज्यसभा किंवा विधानपरिषदेला जाल का?’ पण मी त्यांना नम्रपणे नकार दिला. ज्या ठिकाणी साहेब पडले, त्या ठिकाणीच मला निवडून जाऊन, जनतेसाठी काम करून दाखवायचं आहे. आणि येत्या पंधरा दिवसात येथील जनतेच्या आशीर्वादाने मी निवडून येईल, याचा मला पूर्ण विश्वास आहे,” वैभव नाईक यांच्यासाठी यंदा निवडणूक सोपी होईल असं दिसत नाही. वैभव नाईक यांचा जनसंपर्क मजबूत असला तरी, निलेश राणे यांनी यावेळी एक भक्कम संघटनात्मक आधार तयार केला आहे, ज्यामुळे ते या निवडणुकीत एक गंभीर स्पर्धक ठरू शकतात.

वैभव नाईक यांच्या विरोधात येणारे आव्हान

राणे कुटुंबाच्या दादागिरीचा मुद्दा २०१४ मध्ये वैभव नाईक यांनी पहिल्यांदा निवडणूक जिंकण्यासाठी मांडला होता, आणि आजही तेच मुद्दे ते मांडत आहेत. परंतु, कुडाळ विधानसभा मतदारसंघात अनेक अन्य प्रश्न आहेत, ज्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.

 कुडाळ एमआयडीसीतील अनेक कारखाने बंद पडले आहेत.
 मच्छीमारांचे प्रश्न जसे पर्सनेट आणि एलईडी यांचे मुद्दे आहेत.
 आंबा आणि काजू बागायतदारांच्या अडचणी आहेत.
 तारकर्ली, देवबाग येथील पर्यटन व्यावसायिकांचे समस्याही मोठ्या प्रमाणावर आहेत.

“वैभव नाईक यांना आमदार झाल्यानंतर साडेसात वर्षे सत्तेत असताना विधानसभा क्षेत्रासाठी निधी आणता आलेला नाही. सत्ता असतानाही हे महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावता आले नाहीत. उलट, सी वर्ल्ड सारख्या प्रकल्पांना विरोध केला. हे सर्व मुद्दे त्यांच्या विरोधात जाणारे आहेत,” असं स्थानिक पत्रकारांनी सांगितलं.

अर्थात –
वैभव नाईक यांचा जनसंपर्क आणि उद्धव ठाकरे यांचे निष्ठावान समर्थक म्हणून त्यांचा आधार महत्त्वाचा असला तरी, निलेश राणे यांच्या मजबूत संघटनात्मक बांधणी आणि कुटुंबाच्या प्रभावामुळे त्यांची स्पर्धा गंभीर होऊ शकते. राणे कुटुंबाची राजकीय छाप आणि त्यांच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचलेला विश्वास या निवडणुकीत निर्णायक ठरू शकतो. वैभव नाईक यांच्या विरोधातील मुद्दे, विशेषतः सत्तेत असताना पूर्ण न केलेल्या कामांचे, त्यांच्याविरोधात एक मोठं अस्तित्व निर्माण करतात. त्यामुळे, निलेश राणे यांच्यापुढे असलेले अनुकूल वातावरण यंदाच्या निवडणुकीला एक नवा वळण देईल आणि हे संघर्ष भरपूर चर्चेचे आणि लक्षवेधी ठरेल.
लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून नारायण राणे यांना मिळालेल्या वर्चस्वामुळे, तसेच त्यांना पाठिंबा देणारा एक मोठा मतदार वर्ग असल्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा निकाल नक्कीच पाहण्यासारखा ठरेल. मात्र, राणे परिवाराने शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमानी पक्ष, भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांसारख्या पक्षांमध्ये केलेला हा प्रवास, येथे राहणाऱ्या जनतेवर किती परिणाम करतो, हे आगामी काळात स्पष्ट होईल. याच दरम्यान, वैभव नाईक यांच्या सर्वसामान्य जनतेत मिसळून काम करण्याच्या पद्धतीमुळे, आणि उद्धव ठाकरे यांच्याशी असलेल्या एकनिष्ठ नात्यामुळे त्यांच्या प्रतिमेला किती फायदा होतो, हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top