माढा विधानसभा मतदारसंघात १९९५ पासून राष्ट्रवादी काँग्रेसचे बबनदादा शिंदे यांचा दबदबा कायम आहे, आणि त्यांचे एकहाती वर्चस्व याठिकाणी दिसून येते. त्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघात शिवसेनेचे मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजीराव सावंत, कल्याणराव काळे, धनंजय डिकोळे, संजय कोकाटे यांसारख्या मातब्बर नेत्यांनी बबनदादा शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवली परंतु त्यांना अपयश आले. बबनदादा शिंदे यांचे साखर कारखानदारीत असलेले साम्राज्य, येथील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणारे आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी ऊस जाण्यासाठी पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या त्यांच्या कार्यामुळे या मतदारसंघात त्यांना समर्थन करणारा एक मोठा गट निर्माण झाला आहे. याशिवाय, बबनदादा शिंदे यांचे बंधू आणि सध्याचे करमाळा मतदारसंघाचे आमदार संजय मामा शिंदे यांचा देखील या मतदारसंघामध्ये प्रभाव आहे.
राजकीय धक्के आणि माढा मतदारसंघाची दिशा
२०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीच्या काळात, बबनदादा शिंदे यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला, ज्यामुळे सर्व राजकीय वर्तुळात धक्का बसला. शरद पवार यांचे जवळचे सहकारी मानले जाणारे बबनदादा शिंदे अचानक पक्षाच्या विरोधात गेले, यामुळे मतदारांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. याच प्रकारे, बबनदादा शिंदे यांचे बंधू आणि करमाळा मतदारसंघाचे आमदार संजय मामा शिंदे यांनीदेखील अजित पवार यांच्यासोबत सत्तेसाठी हातमिळवणी केली. या उलट, बबनदादा शिंदे यांचा एकहाती वर्चस्व असताना अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यामागे कोणती रणनीती होती, हे भविष्यातच स्पष्ट होईल.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये बबनदादा शिंदे यांनी चिरंजीव रणजीत शिंदे यांना पुढे आणण्याचे आवाहन केले. मात्र, या निवडणुकीत त्यांनी चिरंजीवांना महायुतीकडून तिकीट न मागता, स्वतंत्रपणे रिंगणात उतरविले आहे. त्यामुळे, माढा मतदारसंघाच्या पारंपरिक निवडणुकीच्या पद्धतीत काहीतरी नवा बदल दिसून येईल असे दिसते. आगामी काळात या निवडणुकीला किती वळणे येतील, हे पाहणं नक्कीच रोचक ठरणार आहे.
माढा २०२४: महायुती, महाविकास आघाडी आणि अपक्षांचे सशक्त आव्हान
२०२४ विधानसभा निवडणुकीत माढा मतदारसंघात राजकीय रंग अधिकच गडद होणार आहेत. महायुतीच्या तिकिटावर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) ने या जागेवर आपला उमेदवार ADV. मीनलताई दादासाहेब साठे यांना रिंगणात उतरवले आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीच्या तर्फे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघात अभिजीत धनंजय पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्याचवेळी, माजी आमदार बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र रणजीत शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे, माढा मतदारसंघात यंदा एक लक्षणीय तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये तीन प्रमुख उमेदवार आपापले राजकीय वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहेत.
माढा २०२४: मोहिते पाटील घराण्याचा प्रभाव आणि बबनदादा शिंदे यांची ‘खिंडीत पकड’?
माढा विधानसभा मतदारसंघात माळशिरस आणि पंढरपूर भागातील काही गावांचा समावेश आहे, या भागात मोहिते पाटील घराण्याचा प्रभाव मोठा आहे. गेल्या काही दशकांपासून, या घराण्याचा पाठिंबा ज्यांना मिळतो, त्यांना या मतदारसंघात अधिक ताकद मिळते, हे एक ठरलेलं समीकरण आहे. यंदाच्या निवडणुकीत, महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजीत पाटील, जे मूळचे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आहेत, त्यांना मोहिते पाटील घराण्याचा पाठिंबा मिळाल्यामुळे त्यांची स्थिती अधिक मजबूत झाली आहे. हे पाहता, शरद पवार यांनी बबनदादा शिंदे यांना राजकीयदृष्ट्या “खिंडीत पकडण्याचा” प्रयत्न केला आहे, असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरू नये.
दुसरीकडे, महायुतीचे उमेदवार मीनलताई साठे यांचा माढा भागातील प्रभाव देखील महत्त्वपूर्ण आहे. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे यांच्या कुटुंबातील व्यक्तीला महायुतीकडून उमेदवारी देण्यात आल्यामुळे स्थानिक राजकारणात काहीतरी नवा वळण घेतला आहे. यामुळे सगळ्यांच्याच मनात आश्चर्याचा ठिपका आहे. शिवाजीराव सावंत, जे बबनदादा शिंदे यांचे प्रमुख विरोधक मानले जातात, त्यांनी महायुतीचे विरोधी उमेदवार रणजीत शिंदे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे या मतदारसंघातील राजकीय लढत आणखी रंगतदार होणार आहे, ज्यात विविध राजकीय समीकरणं आणि नवीन धोरणं मोठा फरक दाखवतील.
माढा २०२४: उमेदवारांच्या नावांतील साम्यामुळे मतदारांचा गोंधळ
माढा विधानसभा मतदारसंघात यंदा उमेदवारांची नावे देखील एक मोठा गोंधळ निर्माण करत आहेत. अभिजित पाटील या नावाचे चार उमेदवार रिंगणात उतरले आहेत, तर रणजीत शिंदे या नावाचे दोन उमेदवार आहेत. या नावांच्या गोंधळामुळे मतदारांना योग्य उमेदवार निवडण्यात काहीशी अडचण होण्याची शक्यता आहे. यात विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, बहुजन समाज पार्टी (बसपा)चे उमेदवार “अभिजित धनवंत पाटील” या नावाने निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार “अभिजीत धनंजय पाटील” या नावाने उभे आहेत. नावाच्या गोंधळामुळे काय परिणाम होतील, हे लक्षवेधी ठरणार आहे.
अर्थात
यंदाच्या निवडणुकीत ‘भाकरी फिरणार की शिंदे सरकार कायम राहणार?’ हे प्रश्न उपस्थित झाले आहेत. बबनदादा शिंदे आणि संजय मामा शिंदे यांच्या मोहिते पाटील घराण्याशी असलेल्या राजकीय विरोधामुळे या परिसरात नवा वळण घेत आहे. मोहिते पाटील घराण्याने आपल्या संपूर्ण टीमला सक्रिय करून अभिजीत पाटील यांचा प्रचार सुरु केला आहे, ज्यामुळे त्यांचे समर्थन वाढत असल्याचे दिसते. तसेच, शिवसेना शिंदे गटाचे शिवाजीराव सावंत यांनी रणजीत शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला असला तरी, शिवाजीराव सावंत यांना मानणारा मतदार किती प्रमाणात रणजित शिंदे यांच्या पाठीशी उभा राहील हे नक्कीच पाहण्यासारखे ठरेल. दररोज या मतदारसंघात राजकीय घडामोडी घडत असून, प्रत्येक उमेदवाराने या निवडणुकीला एक प्रतिष्ठेचे स्वरूप दिले आहे.