शिंदे गटाच्या उमेदवारीने राजकीय समीकरणं बदलली, आगामी निवडणुकीत कोण होईल विजयी…???

एक सस्पेन्स थ्रिलर – शिंदे गट, ठाकरे गट आणि मनसे एकाच रणभूमीवर!

माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्याने शिवसेना व मनसे यांची यांची ताकत जास्त आहे. यामध्ये १९९० पासून २०१९ पर्यंत शिवसेनेचा आमदार असल्याचे दिसून येते. त्याला अपवाद २००९ विधासभा निवडणुकीमध्ये मनसे चे नितीन सरदेसाई या मतदारसंघामध्ये आमदार म्हणून निवडून आले. शिवसेनेची सत्ता कायम राहण्याचे एक मुख्य कारण म्हणजे येथील शिवसेना भवन, जे शिवसेनाप्रमुखांसाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे आणि त्यामुळे शिवसेनाचे समर्थक मोठ्या प्रमाणावर आहेत. तथापि, २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडल्यामुळे येथील राजकीय चित्रात बदल झाला असून, आमदार सदा सरवणकर एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्याने परिस्थिती काहीशी वेगळी झाली आहे.

माहीम विधानसभा मतदारसंघ २०२४ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक कारणांमुळे चर्चेत आला आहे. यंदा या मतदारसंघातून मनसेकडून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीत सहभागी होत आहेत. त्याचवेळी, शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनाही येथून उमेदवारी मिळाली आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे अमित ठाकरे यांच्यासाठी ते एक मोठे आव्हान ठरू शकतात. यामुळे सदा सरवणकरांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांना माघार घेण्याची आणि समजावण्याचीही प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडून केले गेले. तथापि, हे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाहीत. सध्या माहीम विधानसभा मतदारसंघात मनसे, शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यामध्ये तिरंगी लढत सुरू असल्याचे दिसून येत आहे.

शिंदे विरुद्ध ठाकरे : नवीन वादाची सुरूवात?

राज ठाकरे यांनी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा दिला होता. मात्र, महायुतीचे उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच त्यांनी माहीम विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे आमदार असताना देखील येथून पुत्र अमित ठाकरे यांना उमेदवार म्हणून जाहीर केले. यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासाठी स्थिती कठीण झाली आणि त्यांना राजकीय धक्का बसला. शिंदे गटाच्या उमेदवारीविषयी एकनाथ शिंदे यांचे म्हणणे आहे की, “जर येथे उमेदवार दिला नसता, तर शिंदे गटाच्या मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा उद्धव ठाकरे गटाला झाला असता.” त्यामुळे शिंदे गटाने उमेदवारी मागे घेतली नाही. याशिवाय, उद्धव ठाकरे गटाच्या मतविभाजनामुळे सदा सरवणकर यांना फायदा झाला, तर त्यात आश्चर्याची बाब नाही.

भाजपाची भूमिका:

या तिरंगी लढतीत भाजपाने जाहीर केले आहे की, येथील स्थानिक भाजप कार्यकर्ते अमित ठाकरे यांना पाठिंबा देऊन त्यांचा प्रचार करतील. याबद्दल अमित ठाकरे यांनी भाजपचे आभार देखील मानले आहेत. परंतु, येथील भाजप कार्यकर्ते खरच मनसेचा प्रचार करतील का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. भाजपने या पाठिंब्याद्वारे लोकसभा निवडणुकीची परतफेड केली आहे का, हे देखील पुढील काळात स्पष्ट होईल.

माहीम विधानसभा मतदारसंघातील राजकीय संघर्ष आणि आगामी निवडणूक चढाओढ :

माहीम विधानसभा मतदारसंघात सदा सरवणकर हे २०१४ आणि २०१९ मध्ये दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांना मानणारा कार्यकर्ता वर्ग देखील मोठ्या प्रमाणात आहे. शिवसेना फुटल्यानंतर, सरवणकर यांचे माजी सहकारी आणि विभागप्रमुख महेश सावंत यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना या निवडणुकीत उमेदवारी मिळाली. महेश सावंत यांचा स्थानिक मंडळांमध्ये समर्थक वर्ग असल्यामुळे, उद्धव ठाकरे यांना मानणारा एक मोठा गट असल्याचे दिसून येते, ज्याचा फायदा महेश सावंत यांना होऊ शकतो. या मतदारसंघामध्ये एक खास बाब म्हणजे, या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या सभेचे आयोजन होणार नाही. पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले, “मुंबई ही माझी आहे आणि येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षावर प्रेम करणारे मतदार आहेत, त्यामुळे मला येथे सभा घेण्याची गरज नाही.”

मनसेचे उमेदवार अमित ठाकरे यांनी देखील दिवाळीच्या कालावधीत विविध कार्यक्रम घेत लोकांशी संपर्क वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा प्रचार जरी सुरू असला तरी, २००९ मध्ये येथून मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई यांचा विजय लक्षात घेता, मनसे व राज ठाकरे यांना मानणारा मतदार वर्ग सुद्धा या मतदारसंघात आहे. यामुळे अमित ठाकरे यांना फायदा होऊ शकतो. तसेच, २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मनसे पक्षाच्या उमेदवाराला क्रमांक २ ची पसंती मिळाल्याचा फायदा अमित ठाकरे यांना होऊ शकतो. त्याचबरोबर, अमित ठाकरे यांची लोकप्रियता एक तरुण चेहरा म्हणून वाढत असल्याचे दिसते.

अर्थात :

राज ठाकरे यांच्या पक्षाकडून सदा सरवणकर यांना उमेदवारी अर्ज माघार घेण्याची विनंती करण्यात आली होती, परंतु सदा सरवणकर हे त्यासाठी तयार नव्हते, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यामध्ये शिंदेंच्या शब्दावर विश्वास ठेवताना, शिंदेंनी खरोखर सदा सरवणकरांना माघार घेण्याची विनंती केली होती का, हे देखील विचार करण्यासारखा मुद्दा आहे. जर शिंदे गटाने सदा सरवणकर यांना उमेदवारी दिली नसती, तर “ते फक्त आमदारांचा सत्तेसाठी वापर करतात” अशी प्रतिमा निर्माण होऊ शकली असती म्हणूनच शिंदे गटाने सदा सरवणकर यांना उमेदवारी जाहीर केली. उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात एक दृष्टिकोन असा असल्याचे सांगितले जाते की, “तुम्ही माझ्या मुलासाठी मार्ग मोकळा करा, मी तुमच्या मुलासाठी मार्ग मोकळा करतो,” असे समीकरण निर्माण झाल्यास, त्यात काही आश्चर्य वाटायला नको. यामधून उद्धव ठाकरे यांना एकाच वेळी शिंदे गटाला वरळी व माहीम मतदारसंघामधून पराभूत करण्याची संधी मिळू शकते..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top