२५ वर्षीय युवकाची पहिल्याच निवडणुकीत आमदार म्हणून निवड

“महाराष्ट्रातील सर्वात तरुण आमदार : विरोधकांना धक्का देत, विकासाच्या आशा निर्माण करणारा युवक”

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, त्यात अनेक अनपेक्षित आणि धक्कादायक निकाल समोर आले आहेत. सांगली जिल्ह्यातील तासगाव – कवठेमहांकाळ विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाने २५ वर्षीय तरुण रोहित पाटील यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्यासमोर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माजी खासदार संजय काका पाटील यांचे तगडे आव्हान होते. तरीही, नवख्या रोहित पाटील यांनी आपल्या प्रभावी नेतृत्व आणि कार्यक्षमतेच्या जोरावर माजी खासदार संजय काका पाटील यांना पराभूत केले. या निवडणुकीचा विश्लेषण करताना, रोहित पाटील यांचा विजय हा त्यांच्या युवा नेतृत्वाच्या क्षमतेचा आणि नव्या विचारांची शक्तीचा दाखला ठरला आहे.

तासगाव विधानसभा मतदारसंघामध्ये रोहित पाटील यांचा उदय

तासगाव विधानसभा मतदारसंघात १९९० पासून माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे एकहाती वर्चस्व होते. त्यांच्या निधनानंतर २०१५ च्या पोटनिवडणुकीत आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांची पत्नी सुमनताई पाटील विजयी झाल्या. यामध्ये संपूर्ण निवडणुकीचे नियोजन आणि आखणी रोहित पाटील यांनी केली असल्याचे येथील जाणकार सांगतात. या मतदारसंघात आर. आर. पाटील यांना मानणारा एक मोठा गट आहे, आणि रोहित पाटील हे त्या गटाला सोबत घेऊन त्याच धर्तीवर राजकारण करत आहेत. तेही आर. आर. पाटील यांच्या राजकीय वारशाचा पाठपुरावा करत आहेत, असे येथील मतदार मानतात. तथापि, या मतदारसंघात त्यांचे विरोधक म्हणून संजय काका पाटील यांचा एक मोठा गट आहे. संजय काका पाटील हे २०१४ आणि २०१९ लोकसभा निवडणुकीत खासदार म्हणून निवडून आले होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला, तरी त्यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी दाखल केली होती.

विरोधकांना मोठा धक्का आणि मतदारांचा विश्वास

कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीत रोहित पाटील यांचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले होते. त्यावेळी, त्यांनी १० नगरसेवक निवडून आणून विरोधकांना धक्का दिला होता. वयाच्या २३ व्या वर्षी १० नगरसेवक निवडून आणल्यामुळे त्यांचे कौतुक शरद पवार यांनी स्वतः केले होते आणि त्यांना शाबासकी देखील दिली होती. तसेच, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचार केला होता. त्यांच्या कामाच्या शैलीमुळे शरद पवार यांनी त्यांना २०२४ विधानसभा निवडणुकीची उमेदवारी दिली. या निवडणुकीत रोहित पाटील यांच्याविरोधात राज्यपातळीवरील अनेक मोठ्या नेत्यांनी सभा घेतल्या आणि त्यांचा पराभव करण्याचा प्रयत्न केला. पण, रोहित पाटील यांनी संजय काका पाटील यांना २७,६४४ मतांच्या फरकाने पराभूत करून आपला विजय साकारला. यामध्ये, रोहित पाटील यांच्याव्यतिरिक्त त्यांच्या नावामध्ये साधर्म्य असणारे ३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते, त्यामुळे मतदारांचे लक्ष थोडे विचलित झाले आणि काही मतं अपक्ष उमेदवारांना गेली, असे येथील मतदार सांगतात. तरीही, रोहित पाटील मोठ्या मतांच्या फरकाने निवडून आले.

आमदार रोहित पाटील यांच्याकडून असणाऱ्या जनतेच्या अपेक्षा

या निवडणुकीत रोहित पाटील यांनी प्रतिष्ठित उमेदवाराला पराभूत करून विजय मिळवला. आता मतदारसंघातील सर्वांचे लक्ष याकडे आहे की, ते विधानसभेत जाऊन विकासाच्या दृष्टीने किती महत्त्वाचे प्रश्न मांडतील आणि त्यासाठी निधी मिळवून आणतील. तसेच, एक तरुण आमदार या विधानसभेत निवडून आल्याने येथील युवकांमध्ये एक वेगळीच ऊर्जा आणि उत्साह पाहायला मिळतो आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top