महाराष्ट्रात आजपर्यंतच्या निवडणुकांमध्ये असलेला हा गोंधळ, वाद आणि अनिश्चितता, या सर्व गोष्टींचा प्रभाव निवडणुकीवर पडणार…..???
२०१९ विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक उलथापालथ घडल्या. महाविकास आघाडीच्या एकात्मतेत बंडखोरी, तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या भाजपसोबत जाण्याने महायुती सरकार स्थापन झाले. आज, २०२४ च्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे, आणि ही निवडणूक महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकते.
महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या प्रक्रियेत एकत्रितपणा कमी झाला आहे. एका बाजूला पक्षांच्या इतिहासाला धक्का बसला, तर दुसरीकडे, महायुतीच्या जागावाटपासाठी दिल्लीच्या नेत्यांना जावे लागले. हे दोन्ही घटक एकत्रितपणे विचार केल्यास, निवडणूक परिणाम कसे बदलतील हे पाहणे खूप महत्त्वाचे ठरेल.
महाराष्ट्रात आजपर्यंतच्या निवडणुकांमध्ये असलेला हा गोंधळ, वाद आणि अनिश्चितता, या सर्व गोष्टींचा प्रभाव २०२४ च्या निवडणुकीवर निश्चितपणे पडणार आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाने आपले धोरण विचार करणे आवश्यक आहे. ही निवडणूक फक्त मतांचे राजकारण नाही, तर महाराष्ट्राच्या भविष्याचा निर्धार करण्यासाठी एक मोठा टप्पा ठरेल.
आपण २०२४ च्या निवडणुकांचे चित्र समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत, कारण सर्वसामान्य नागरिक म्हणून आपल्याला या परिस्थितीचा एक सारांश मिळवणे महत्त्वाचे आहे. २०२४ च्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी, महायुती, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, MIM, आणि वंचित बहुजन आघाडी या पक्षांचा प्रामुख्याने समावेश आहे. चला, माहिती घेऊया.
१) महाविकास आघाडी :
महाविकास आघाडीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार), आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे, ज्यांच्यासोबत मित्र पक्ष देखील आहेत. आयुष्यभर ज्याच्याविरुद्ध लढा दिला, त्या पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देणे अनेकांना न पटल्यामुळे बंडखोरी वाढत आहे. जागावाटपाच्या प्रक्रियेत एकमेकांवर रुसून बसणे आणि जास्तीच्या जागा मागणे यांसारख्या घटनांनी परिस्थिती जटिल केली आहे, परंतु यावर अंतिम निर्णय होऊन उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. महाविकास आघाडीतील उमेदवारांनी अर्ज दाखल केले असले तरी त्यांना बंडखोरीचा तितकाच फटका बसू शकतो. बंडखोर उमेदवारांना थांबवण्यासाठी या तीन पक्षांच्या प्रयत्नांची यशस्विता पाहण्यासारखी असेल.
२) महायुती :
महायुतीमध्ये शिवसेना (एकनाथ शिंदे गट), भाजप, आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांचा समावेश आहे, तसेच काही मित्र पक्ष देखील आहेत. जागावाटपाची चर्चा महाराष्ट्रात न होता दिल्लीमध्ये झाल्याचे माध्यमांतून आढळून आले आहे. जागावाटपाच्या प्रक्रियेपूर्वी महायुतीतील प्रमुख नेत्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया न दिल्यामुळे याबद्दल जास्त चर्चा झाली नाही. त्यामुळे महायुतीला फारसा फायदा झालेला नाही, पण त्यांना बदनामी टाळण्यासाठी हा एक प्रयत्न असावा. महायुतीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले असले तरी त्यांनाही बंडखोरीचा फटका बसला आहे. अनेक नेत्यांनी या विचाराने बंडखोरी केली की, विरोध करताना त्यांनी किती काळ टिकून राहिले, पण आज त्यांचाच प्रचार करावा लागतो. काही स्थानिक नेत्यांनी पक्षात राहून पक्षाविरुद्ध काम करण्याचा निर्णय घेतला, तर काहींनी महाविकास आघाडीत प्रवेश करून उमेदवारी मिळवली.
३) महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) :
२०१९ च्या निवडणुकीत मनसेने १०१ उमेदवार उभे केले होते, त्यात कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील विजयी झाले. त्यांच्या यशाचे मुख्य कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा असल्याचे सांगितले जाते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मनसेने भाजपला पाठिंबा दिला, परंतु विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर “एकला चलो रे” ही भूमिका घेतली. याचा परिणाम महायुती आणि महाविकास आघाडीवर कसा होईल, हे निकालानंतर स्पष्ट होईल. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने आतापर्यंत ५ याद्या जाहीर केल्या आहेत आणि उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीच्या पर्यायांव्यतिरिक्त मनसे एक नवा पर्याय म्हणून उभी राहिली आहे. त्यांच्या यशावर मतांचे विभाजन, जातीय समीकरणे आणि उमेदवारांचा प्रभाव हे घटक अवलंबून असतील.
४) मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील :
मनोज जरांगे सध्या महाराष्ट्रात मराठा आंदोलक म्हणून सक्रिय आहेत आणि गेल्या काही वर्षांपासून मराठा समाजाच्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. त्यांच्या मागण्यांची मान्यता न मिळाल्यामुळे त्यांनी सरकारविरोधात हल्लाबोल सुरू केला आहे. त्यांच्या “जरांगे फॅक्टर” चा २०२४ लोकसभा निवडणुकीत परिणाम झाला, अशी चर्चा आहे. मागील काही दिवसांपासून त्यांनी राजकारणात प्रवेश करून त्यांच्या मागण्यांचे समाधान कसे करायचे याबाबत तयारी करत असल्याचे दिसून येत आहे. त्यांनी २०२४ विधानसभा निवडणुकीसाठी स्थानिक इच्छुक उमेदवारांना आपापसात संगनमत करून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना दिल्या, ज्यामुळे त्यांच्या समर्थकांनी अर्ज दाखल केले. आता जरांगे पाटील वैयक्तिक राजकारण करतील का, की महाविकास आघाडीच्या/महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
अर्थात :
राजकारणात काहीही होऊ शकते, हे आपण सर्वांनी लहानपणापासून ऐकले आहे, पण आता प्रत्यक्षात ते अनुभवत आहोत. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील बंडखोरी आणि विरोधी उमेदवारांना दिला जाणारा छुपा पाठिंबा थोपवण्यात कितपत यशस्वी ठरतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. महायुतीमध्ये “मैत्रीपूर्ण लढत” च्या नावाखाली जागा कमी झाल्यास, त्याचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो, याची कल्पना महायुतीला असलाच हवी. “लाडकी बहीण” भावाला कितपत मतदानाचे प्रेम देते, हे देखील स्पष्ट होईल. सर्व पक्षांचे लक्ष लागून राहिलेल्या “जरांगे फॅक्टर” चा कल कोणत्या बाजूने जातो, हे निकालानुसार समजेल; परंतु श्री. मनोज जरांगे पाटील यांनी प्रत्येक मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केले असल्यामुळे, त्याचा फटका महाविकास आघाडीला देखील बसू शकतो.