उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आजही धक्क्यांच्या मालिकेतून जात आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काही महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी महायुतीकडे गेल्यानंतर, आता कोकणातील आणखी एक नेता ठाकरे गटाची साथ सोडणार असल्याची माहिती समोर येत आहे. कोकण हा शिवसेना ठाकरे गटाचा पारंपारिक बालेकिल्ला समजला जातो, पण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली पक्षात पडलेली फूट आणि त्यानंतर झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे कोकणात ठाकरे गटाची स्थिति कमजोर झाली आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले, तर महाविकास आघाडीची स्थिती आणखी कमजोर झाली. शिवसेना ठाकरे गटालाही अपेक्षित कामगिरी करता आली नाही. राजापूर मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी यांनी पक्षातील फूटीनंतर ठाकरेंना साथ देण्याचा निर्णय घेतला होता, मात्र शिवसेना ठाकरे गटाला नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाचे किरण सामंत यांच्याकडून मोठा धक्का बसला.
राजन साळवी यांच्या पक्ष प्रवेशाची चर्चा
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे निष्ठावंत आणि कोकणातील राजकीय दिग्गज म्हणून ओळखले जाणारे राजन साळवी विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षाबद्दल नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. राजन साळवी हे शिंदे गटात जाऊन शिवसेना (एकनाथ शिंदे) मध्ये प्रवेश करणार की भाजपमध्ये जाणार, यावर अनेक चर्चांना उधाण आले आहे. भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी देखील राजन साळवी पक्षात सामील झाले, तर त्यांचे स्वागत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
राजापूर विधानसभा मतदारसंघाचे तीन वेळा आमदार राहिलेले राजन साळवी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले. किरण सामंत यांनी त्यांचा पराभव केला, ज्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला. यामुळे, एसीबीच्या रडारवर असलेल्या आणि निवडणुकीत पराभूत झालेल्या राजन साळवी यांची शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाबद्दल नाराजी वाढली आहे. त्यांचा पक्ष सोडून इतर पक्षात सामील होण्याच्या चर्चाही जोर धरू लागल्या आहेत.
राजन साळवी यांच्यावर काही दिवसांपूर्वी यंत्रणांकडून मोठी चौकशी करण्यात आली होती. एका प्रकरणात अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरात येऊन मोजणी करत घरातील वस्तूंच्या किंमती जाणून घेण्यापर्यंत चौकशीचा विषय गेला. यामुळे साळवी कुटुंब नाराज झाले होते अशी चर्चा येथील नागरिकांमध्ये असल्याचे दिसून येते. यावेळी राजन साळवी यांनी आपली हेतूपुरस्करपणे चौकशी केली जात असल्याचा आरोप केला होता.
पराभवाची खंत, पण शिवसेनेशी निष्ठा कायम –
भाजपा किंवा शिवसेना (एकनाथ शिंदे) मध्ये जाण्याच्या चर्चांवर राजन साळवी म्हणाले, “ठाकरेंचे निष्ठावंत सैनिक म्हणून माझी ओळख आहे. २०२४ च्या पराभवास सामोरे जात असताना, त्याचं दुःख, खंत आणि वेदना माझ्या व माझ्या मतदारसंघातील सामान्य जनतेच्या मनात आहे. पराभवाच्या वेदनेच्या दरम्यान, शिवसेना भविष्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. तुमच्या माध्यमातून मला समजते की मी नाराज आहे आणि भाजपा किंवा शिंदे गटाच्या पक्षात जात आहे अशी चर्चा आहे. परंतु तसं काही नाही. माझ्या रोजच्या कामात माझं मार्गक्रमण सुरू आहे, आणि अशा प्रकारच्या बातम्या फक्त अफवा आहेत. हा निष्ठावंत सैनिक बाळासाहेबांच्या मार्गावरच राहणार आहे, यात कोणतीही शंका नाही.”
पूढे ते म्हणाले, “पिकल्या आंब्यावर दगड मारण्याचा प्रयत्न भाजपाकडून झालेला असावा, पण माझ्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही. पक्षात प्रवेश करणाऱ्या व्यक्तीचं स्वागत करणं प्रत्येक पक्षप्रमुखाचं कर्तव्य असतं. जर मतदारसंघात आणि जिल्ह्यात माझ्या संघटन कौशल्यामुळे एखाद्या पक्षाला मी महत्वाचा वाटत असेल, तर त्यांची अपेक्षा असू शकते.”
पराभवानंतर पक्षश्रेष्ठींच्या संपर्काच्या चर्चेवर राजन साळवी म्हणाले, “पराभवाच्या नंतर मुंबईतील मातोश्री येथे पराभूत उमेदवारांची बैठक घेतली होती. त्यात पराभवाचे कारण आणि आत्मचिंतन करण्यात आले. त्याच्याशी संबंधित विचार आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत.”
शिंदे गटाच्या नेत्यांना राजन साळवी यांचे प्रतिउत्तर
शिवसेना शिंदे गटाचे मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले की, “राजन साळवी जर पक्षात येणार असतील, तर त्यांचे स्वागत आहे.” यावर राजन साळवी यांनी उत्तर दिलं की, “पक्षात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं स्वागत करण्याची भावना असते. मी माझ्या मतदारसंघात संघटन कौशल्याने काम केले आहे. त्यामुळे त्यांचा तो विचार असावा.”
उद्धव ठाकरे गटातील निवडून आलेले आमदार आणि माजी आमदार शिवसेनेत येण्याची इच्छा व्यक्त करत असल्याचं नरेश म्हस्के यांनी सांगितलं. या संदर्भात राजन साळवी म्हणाले, “ते त्यांच्या व्यक्तीगत मतानुसार बोलत असतील. मी माझ्या भावना आधीच स्पष्ट केल्या आहेत. माझ्या पदाधिकाऱ्यांच्या आणि मतदारसंघातील जनतेच्या भावना महत्त्वाच्या आहेत. मी रोजच्या पद्धतीने काम करत आहे.”