महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळाल्यानंतर अनेक नाट्यमयी घडामोडी घडल्या. भाजपला १३२, शिवसेना (शिंदे गट) ला ५७, आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) ला ४१ जागांवर विजय मिळाला. याचबरोबर महायुतीला काही अपक्षांनीही पाठिंबा दिला. यानंतर संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा मुख्यमंत्रीपदावर असलेल्या संघर्षाकडे लागल्या होत्या. विरोधकांकडून महायुतीवर टीका होत होती. एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनंतर, ४ डिसेंबर रोजी भाजपने मुख्यमंत्री पदासाठी आपला दावा केला आणि हे पत्र एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत राज्यपालांना सुपूर्द करण्यात आले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाले. अजित पवार यांनी देखील जाहीर केले की, ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, परंतु एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका जाहीर केली नव्हती. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्यानंतर, आज (५ डिसेंबर) देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीला मान्यवरांची उपस्थिती, मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेत केला विक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासह मोदी यांच्या मंत्रिमंडळातील अनेक सदस्य आणि भाजप सत्ताधारी असणाऱ्या राज्यांचे मुख्यमंत्री या शपथविधीला उपस्थित होते. त्याशिवाय राजकीय, बॉलीवूड, क्रीडा, सामाजिक आणि उद्योग क्षेत्रातील मोठ्या दिग्गजांनी देखील या ऐतिहासिक सोहळ्यात हजेरी लावली. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि यानंतर मुख्यमंत्रीपदावर तिसऱ्यांदा शपथ घेणारे ते महाराष्ट्रातील पहिले नेते ठरले. शपथ घेतल्यानंतर, लगेचच कॅबिनेट बैठकीत त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पुण्याच्या एका नागरिकाच्या उपचारासाठी ५ लाख रुपयांची मदत मंजूर केली.
देवेंद्र फडणवीस : एक राजकीय नेता, ज्याची सुरुवात संघर्षातून झाली
“माझ्या बाबांना इंदिरा गांधींनी अटक केली, त्यामुळे मी इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये शिकणार नाही,” हे वयाच्या सहाव्या वर्षी देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या आईला ठामपणे सांगितले. आणीबाणीच्या काळात केलेली ही व्रत, त्यांना शेवटी इंदिरा कॉन्व्हेंटमधून सरस्वती शाळेत प्रवेश घ्यावा लागला. देवेंद्र फडणवीस यांचे वडील, स्व. गंगाधरराव फडणवीस हे विधानपरिषद आमदार होते. त्यांचे निधन झाल्यानंतर देवेंद्र यांनी राजकारणात पाऊल ठेवले आणि वडिलांचा राजकीय वारस म्हणून आपली कारकीर्द सुरू केली.
नागपूर विद्यापीठातून कायद्याची पदवी घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी व्यवसाय व्यवस्थापनातही पदवी मिळविली, तसेच बर्लिनच्या डी. एस. ई. संस्थेतून प्रकल्प व्यवस्थापनाच्या पद्धती आणि तंत्र विषयात पदविका संपादन केली. नव्वदीच्या दशकात राजकारणात प्रवेश केल्यानंतर, देवेंद्र फडणवीस यांना अल्पावधीतच मोठा जनआधार मिळविला. त्यांचे राजकीय जीवन नागपूर महानगरपालिकेपासून सुरु झाले, जिथे त्यांनी सलग दोन वेळा (1992 आणि 1997) निवडणूक जिंकली. तसेच, नागपूरचे महापौर म्हणून ते सेवा देत होते, आणि ते भारतातील दुसरे सर्वात तरुण महापौर म्हणून ओळखले जातात. महापौरपदी पुन्हा निवडून येऊन, महाराष्ट्रात ‘मेअर इन काऊन्सिल’ या मानाचे प्राप्त करणारे ते पहिले महापौर ठरले.
देवेंद्र फडणवीस: राजकारणातील एक ठळक नाव<?h2>
देवेंद्र फडणवीस यांनी १९८९ मध्ये आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. तेव्हा ते भारतीय जनता युवा मोर्चाचे नागपूरमधील वॉर्ड अध्यक्ष होते. १९९९ पासून ते आजतागायत महाराष्ट्र विधानसभा सदस्य आहेत. १९९२ ते २००१ दरम्यान, त्यांनी सलग दोन वेळा नागपूर महापालिकेचे सदस्य म्हणून कार्य केले आणि संघाच्या पाठिंब्यावर दोन वेळा नागपूरचे महापौर बनले. १९९४ मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली, आणि २००१ मध्ये ते युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष झाले. २०१० मध्ये त्यांना भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाचे सरचिटणीस म्हणून जबाबदारी मिळाली. स्व. गोपीनाथ मुंढे यांच्या पाठिंब्यामुळे २०१३ मध्ये ते भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष बनले. त्यानंतर, २०१४ मध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची ओळख ठरली. २०१९ मध्ये, ८० तासासाठी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी एक वेगळा विक्रम केला, ज्यामुळे त्यांची राजकीय कारकीर्द वेगळीच ठरली. अल्पावधीत सरकार कोसळल्यानंतर, २०१९ ते जून २०२२ पर्यंत ते महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते होते. शिवसेनेतील फुटीनंतर, जून २०२२ पासून देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. आज, ५ डिसेंबर २०२४ रोजी, त्यांनी एकदाच पुनः मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली, आणि राजकीय क्षेत्रातील एक ठळक वळण घेतले.