महायुती vs महाविकास आघाडी: अटीतटीच्या लढतींनी बनवला निकाल

“महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या रोमांचक लढती आणि अनपेक्षित निकाल”

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे, २८८ विधानसभेच्या जागांसाठीचे निकाल जाहीर झाले आहेत. याप्रमाणे, राज्यात महायुतीचे सरकार स्थापनेला कोणतीही शंका नाही. या निवडणुकीत अनेक अनपेक्षित निकाल समोर आले असून, काही मोठ्या नेत्यांचा पराभवही झाला आहे. यामागे “लाडकी बहीण” योजनेचा प्रभाव असावा, असे मानले जात आहे. त्याचप्रमाणे, या निवडणुकीत अनेक अटीतटीच्या लढतीदेखील झाल्या. आज आपण अशाच अटीतटीच्या लढतींबद्दल अधिक माहिती पाहणार आहोत.

मालेगाव मध्य

मालेगाव मध्य मतदारसंघात All India Majlis-E-Ittehadul Muslimeen पक्षाचे मुफ्ती मोहम्मद इस्माइल अब्दुल खलीक आणि Indian Secular Largest Assembly of Maharashtra पक्षाचे आसिफ शेख रशीद यांच्यात जोरदार लढत झाली. हा मतदारसंघ मुस्लिम बहुल असल्यामुळे दोन्ही उमेदवारांमध्ये अटीतटीची स्पर्धा होती. अखेर, All India Majlis-E-Ittehadul Muslimeen पक्षाचे मुफ्ती मोहम्मद इस्माइल अब्दुल खलीक यांनी Indian Secular Largest Assembly of Maharashtra पक्षाचे आसिफ शेख रशीद यांना केवळ १६२ मतांच्या फरकाने पराभूत केले.

साकोली

साकोली मतदारसंघात काँग्रेस आणि भाजप यांच्यात थेट लढत होती. काँग्रेस कडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि भाजप कडून अविनाश ब्राह्मणकर यांच्यात स्पर्धा झाली. या लढतीत नाना पटोले यांनी अविनाश ब्राह्मणकर यांना केवळ २०८ मतांच्या फरकाने पराभूत केले. नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असले तरी, त्यांचा हा विजय सोपा नव्हता, त्यामुळे त्यांचा विजय संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला आहे.

बेलापूर

बेलापूर मतदारसंघात नेहमीप्रमाणे नाईक आणि म्हात्रे यांच्यात थेट लढत होती. भाजप कडून आमदार मंदा म्हात्रे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून गणेश नाईक यांचे पुत्र संदीप नाईक यांच्यात स्पर्धा होती. गणेश नाईक भाजपचे आमदार असले तरी, ते संपूर्ण ताकदीने मुलाच्या पाठीशी उभे राहिले होते. या मतदारसंघात पिपाणी चिन्हाच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांमुळे संदीप नाईक यांचा पराभव झाला, असं दिसून येतं. मंदा म्हात्रे यांनी संदीप नाईक यांना केवळ ३७७ मतांच्या फरकाने पराभूत केले. विशेष म्हणजे, पिपाणी चिन्हाच्या उमेदवाराला तब्बल २८६० मतं मिळाल्याने, संदीप नाईक यांचा पराभव त्यांचं चिन्ह घराघरात पोहोचवण्यात अपयशी ठरल्यानं झाला, असा अंदाज स्थानिकांमध्ये लावला जात आहे.

बुलढाणा

बुलढाणा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात थेट लढत होती. शिवसेना शिंदे गटाकडून संजय गायकवाड आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून जयश्री शेळके यांच्यात निवडणुकीची स्पर्धा होती. या लढतीत संजय गायकवाड ८४१ मतांच्या फरकाने विजयी झाले. संजय गायकवाड यांच्या मताधिक्याचे प्रमाण २०१९ च्या निवडणुकीच्या तुलनेत घटले आहे, यामागे मतदारसंघातील काही मतदारांची नाराजी मुख्य कारण मानली जात आहे. तसेच, एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय काही मतदारांसाठी दुखावणारा ठरला, ज्यामुळे त्यांच्या मताधिक्यात घट झाली, अशी चर्चा स्थानिक लोकांमध्ये दिसून येत आहे.

नवापूर

नवापूर विधानसभा मतदारसंघात महायुती, महाविकास आघाडी आणि अपक्ष यांच्यात मुख्य लढत होती. या लढतीत काँग्रेसचे शिरीषकुमार नाईक, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे भरत गावित आणि अपक्ष शरद गावित यांच्यात तिरंगी लढत होती. या लढतीत शिरीषकुमार नाईक यांनी पहिल्या क्रमांकाची पसंती मिळवली आणि ते ११२१ मतांनी विजयी झाले. दुसऱ्या क्रमांकावर अपक्ष शरद गावित तर तिसऱ्या क्रमांकावर भरत गावित यांना पसंती मिळाली. या निवडणुकीत नावात साधर्म्य असणारे शरद गावित यांना १०१४ मते मिळाली, ज्यामुळे शरद गावित यांचा पराभव झाला, असे दिसून येते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top