विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला मोठा विजय मिळाला. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी मुंबई येथे पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना फोन करून निमंत्रण दिले होते. परंतु विरोधकांमधून कुणीही या सोहळ्यात उपस्थित राहिले नाही. याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधीनंतरच्या पत्रकार परिषदेत भाष्य केले होते. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी अनिल परब, आदित्य ठाकरे, वरूण सरदेसाई आणि सचिन अहिर यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आपली भूमिका बदलून हिंदुत्वाची भूमिका घेतली असल्याचे दिसून येत आहे. यामुळे या भेटीबद्दल विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.
उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्या भेटीवर राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया
या भेटीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली की, “उद्धव ठाकरे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विधिमंडळाचे गटनेते आहेत. त्या अनुषंगाने ते भेटीसाठी आले होते. ही एक सदिच्छा भेट होती. पाहुणे आल्यानंतर त्यांचा आदर करण्यात काहीही वेगळं नाही,” असं त्यांनी सांगितलं. तसेच, उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते पदासाठी काही चर्चा केली का, किंवा त्यांनी काही प्रस्ताव दिला आहे का, असा प्रश्न विचारल्यावर राहुल नार्वेकर यांनी उत्तर दिलं, “माझ्याकडे अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही. मात्र, जर विरोधी पक्षनेतेपदाबाबत काही प्रस्ताव आला, तर त्यावर नक्कीच विचार करेन,” असं त्यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, “महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा या सरकारकडून आहे. याव्यतिरिक्त, निवडणुका कशा जिंकल्या आणि त्याबद्दल काय विचार आहेत, हे मुद्दे आहेत. त्याबाबत आम्ही जनतेत जाऊन आपला आवाज उचलत राहू.”
उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्या भेटीवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया
फडणवीसांना “तू राहशील किंवा मी राहीन” असं आव्हान देणारे उद्धव ठाकरे काल फडणवीसांना भेटल्यानंतर अनेक उलट सुलट चर्चा सुरू झाल्या. त्यावर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “कालच्या भेटीची जोरदार चर्चा करायला काहीच हरकत नाही. आपल्या महाराष्ट्राला एक राजकीय संस्कृती आहे, एक राजकीय संस्कार आहे. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. ते सध्या मुख्यमंत्र्यांना भेटले आहेत. उद्धव ठाकरे हे विधिमंडळ सदस्य आहेत आणि सध्या नागपुरात विधीमंडळाचं अधिवेशन चालू आहे. त्याच कारणामुळे ते नागपुरात होते. याचवेळी त्यांनी फडणवीसांची भेट घेतली. राज्यात नवीन सरकार स्थापन झालं आहे, आणि प्रचाराच्या तोफा आता थंड पडल्या आहेत. महाराष्ट्रातील नवीन सरकारला शुभेच्छा देण्यासाठी उद्धव ठाकरे फडणवीस यांना भेटले असतील. त्या भेटीमुळे खळबळ माजवण्याचं काही कारण नाही.” त्यामुळे जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळी मात्र उद्धव ठाकरे हे २ वर्षांमध्ये त्यांना कधीच भेटले नाहीत परंतु देवेंद्र फडणवीस यांना ते पहिल्याच अधिवेशनामध्ये भेटल्याने याबाबत “चर्चा तर होणारच”.
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील भेटीवर एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया
या भेटीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील भाष्य केले आहे. ते म्हणाले, “विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांच्यात बदल झालेला दिसतोय, आणि हे एक खूप चांगलं संकेत आहे. उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांना भेटले, हे योग्यच आहे. सगळे विरोधक सत्ताधाऱ्यांना भेटतात, मुख्यमंत्री देखील प्रत्येकाला भेट देतात. पण जर आपण पाहिलं तर, काही दिवसांपूर्वी टोकाची टीका करणारे, देवेंद्र फडणवीस यांना संपवण्याची भाषा करणारे, सत्ता आल्यावर त्यांना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे, सरकार आल्यावर तुम्हाला तुरुंगात टाकू असं सांगणारे, २०१९-२० मध्ये तेच लोक जेव्हा त्यांचं सरकार होतं तेव्हा देवेंद्र फडणवीस आणि माझ्याविरोधात कटकारस्थान करणारे, आणि कारस्थान रचून आम्हाला तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न करणारे, आज तेच लोक काय करतायत ते पाहा,” असे त्यांनी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर भाष्य केले.