कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणूक: काँग्रेस च्या उमेदवारी वरून झालेल्या गोंधळामध्ये छत्रपती घराण्याचा महत्वाचा टर्निंग पॉइंट
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघावर देशाचे लक्ष आहे. २००८ च्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर २००९ आणि २०१४ मध्ये शिवसेनेचे राजेश क्षिरसागर येथे आमदार म्हणून निवडून आले होते, ज्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला बनला. तथापि, २०१९ मध्ये स्व. चंद्रकांत जाधव यांनी काँग्रेसला विजय मिळवून शिवसेनेच्या वर्चस्वावर आघात केला. दुर्दैवाने, २०२१ मध्ये चंद्रकांत जाधव यांचे निधन झाले. त्यानंतर २०२२ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री चंद्रकांत जाधव यांनी भाजपच्या सत्यजित कदम यांना पराभूत करत विजय संपादन केला.
महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये उमेदवारीच्या मुद्द्यावर वाद निर्माण झाला होता. सुरुवातीला महायुतीत राजेश क्षीरसागर यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती, पण शिंदे गटाच्या पहिल्या यादीत त्यांना स्थान मिळाले नाही. यामुळे सत्यजित कदम यांचा विरोध आणि खा. धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक यांची मतदारसंघावर दावेदारी, या सर्वामुळे राजेश क्षीरसागर यांना अडचणींचा सामना करावा लागला. अखेर, सत्यजित कदम यांना महामंडळ किंवा विधानपरिषद सदस्य होण्याचे आश्वासन देऊन राजेश क्षीरसागर यांच्या उमेदवारीसाठी मार्ग मोकळा करण्यात आला. दुसरीकडे, काँग्रेसने सामान्य कार्यकर्ता पॅटर्न वापरून, राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या माजी नगरसेवक राजेश लाटकर यांना उमेदवारी दिली.
काँग्रेसमध्ये उमेदवारीवर गदारोळ: लाटकर यांच्याविरोधात २६ माजी नगरसेवकांचा तीव्र विरोध
लाटकर यांची उमेदवारी जाहीर होताच काँग्रेसमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला. उमेदवारी जाहीर झाल्याच्या रात्री काँग्रेस कार्यालयावर दगडफेक करण्यात आली आणि काळं फासण्याचा प्रयत्नही झाला. यामध्ये ‘चव्हाण पॅटर्न’ असा देखील उल्लेख करण्यात आला. यानंतर काँग्रेसच्या २६ माजी नगरसेवकांनी लाटकर यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध केला आणि माजी मंत्री सतेज पाटील यांना पत्र लिहून या उमेदवारीला रद्द करण्याची मागणी केली. यामध्ये सतेज पाटील यांचे समर्थक शारगंधर देशमुख, सचिन चव्हाण यांसह इतर माजी नगरसेवकांचा समावेश होता. या विरोधामुळे मतविभाजन होऊन विरोधकांना फायदा होऊ नये, यासाठी सतेज पाटील यांनी शांत राहून छत्रपती मालोजीराजे यांना पुढाकार घेण्याची सूचना दिली. यानंतर, छत्रपती मालोजीराजे यांनी सर्वांना सोबत घेत आपल्या पत्नी छत्रपती मधुरिमाराजे यांची उमेदवारी निश्चित केली, आणि त्यांचे नाव काँग्रेसच्या यादीत जाहीर झाले. पण, राजेश लाटकर यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला, ज्यामुळे आणखी गोंधळ निर्माण झाला.
माजी आमदार जयश्री जाधव यांचा शिंदे गटात प्रवेश: सतेज पाटील यांना मोठा धक्का
काँग्रेस आमदार जयश्री जाधव यांनी शिंदे गटात प्रवेश केला, ज्यामुळे सतेज पाटील यांना मोठा धक्का बसला. २०१९ मध्ये, सतेज पाटील यांनी “सतेज यंत्रणा” वापरून जयश्री जाधव यांना आमदारकीची संधी दिली होती. मात्र, २०२४ च्या निवडणुकीत जयश्री जाधव यांनी उमेदवारी नाकारली आणि मधुरिमा राजे यांच्या उमेदवारीला विरोध करत थेट शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. या पावलामुळे सतेज पाटील यांना एक खंत व्यक्त करावी लागली, ज्यामध्ये त्यांनी म्हटले, “ज्यांच्यासाठी मी जीवाचं रान केलं, त्यांना किमान बोलायला हवं होतं.”
सतेज पाटील आणि छत्रपती घराण्याचा संघर्ष: कोल्हापूर उत्तरमधील उमेदवारीत गोंधळ
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसची उमेदवारी ही दीर्घकाळ चर्चेत होती. काही दिवसांपूर्वीच, सतेज पाटील यांनी जाहीरपणे सांगितले होते की, या मतदारसंघात उमेदवारी कार्यकर्त्यालाच दिली जाईल. त्यानुसार, राजेश लाटकर यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, लाटकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्येच त्यांना विरोध का होतो, हा प्रश्न निर्माण झाला आहे. कार्यकर्त्याला उमेदवारी दिल्यानंतर त्याच्याकडून विरोध कसा होऊ शकतो? हे सतेज पाटील यांच्यासाठी एक मोठे आव्हान ठरले आहे.
दुसरीकडे, कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीसाठी छत्रपती घराण्याची भूमिका देखील चर्चेचा विषय ठरली. दोन महिन्यांपूर्वी छत्रपती घराण्याच्या सदस्यांना उमेदवारी देण्याबाबत विचारले गेले होते, परंतु त्यावेळी त्यांनी नकार दिला होता. नंतर, राजेश लाटकर यांच्या उमेदवारीला विरोध निर्माण झाल्यानंतर छत्रपती घराण्याने पुन्हा होकार दिला आणि उमेदवारी स्वीकारली.
अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी छत्रपती मालोजीराजे यांना अपेक्षा होती की राजेश लाटकर यांनी केलेली बंडखोरी सतेज पाटील थोपवतील, परंतु त्याउलट सतेज पाटील यांना अपेक्षित यश मिळालं नाही. त्यानंतर, छत्रपती मालोजीराजे यांनी सतेज पाटील यांना माघार घेतल्याची माहिती दिली. याबद्दल सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलण्याचे टाळले, फक्त “जे झाले ते झाले, पुढे काय होईल ते पाहू,” अशी प्रतिक्रिया दिली.
कोल्हापूर उत्तरमधील उमेदवारीच्या गोंधळात छत्रपती घराण्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. त्यांचा निर्णय आणि हस्तक्षेप सतेज पाटील यांच्या निर्णय प्रक्रियेत अडथळा ठरत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे, सतेज पाटील यांना राजकीय गोंधळाला सामोरे जावे लागणार, असे दिसत आहे.
अर्थात :
काँग्रेस उमेदवार मधुरिमा राजे यांनी ऐनवेळी माघार घेतल्यामुळे, आता काँग्रेस आणि सतेज पाटील यांची पुढील रणनीती काय असेल, हे पाहणे अत्यंत रोचक ठरेल. तसेच, बंडखोर अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांना काँग्रेसचा पाठिंबा जाहीर केला तरी, काँग्रेसचे चिन्ह न असल्यामुळे नवीन चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवणे किती प्रभावी ठरेल, हे देखील महत्वाचे ठरते. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांच्यासाठी निवडणूक प्रथमदर्शनी सोपी वाटत असली तरी, सतेज पाटील यांच्या भूमिकेनंतरच पुढील राजकीय घडामोडींवर प्रकाश पडेल.